तळकोकणात टस्कर हत्तीचा धुमाकूळ (फोटो- istockphoto)
तळकोकणात टस्कर हत्तीचा धुमाकूळ
चंदगडच्या दक्षिण भागात पिकाचे नुकसान
ओंकार टस्कर हत्ती पाठोपाठ राजा हत्तीचा हैदोस
गडहिंग्लज: तळकोकणात गेलेल्या राजा टस्कर हत्तीने आता ऐन सुगीतच चंदगड तालुक्यात प्रवेश केला आहे. चंदगडच्या दक्षिण भागातील उमगाव, जांबरे, वाघोत्रे, खामदळे या परिसरातील १५ किलोमीटर क्षेत्रात या हत्तीचा मोठा प्रभाव असून नाचणी, भुईमूग, ऊस, भात पिकाचे नुकसान सुरू आहे. हत्ती हाकारा गट व चंदगड वन विभागाचे प्रथक या हत्तीच्या मागावर असून, गावाजवळच्या शिवारात आलेला हत्ती जंगलात हुसकवण्याचे काम वन कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील ओंकार टस्कर हत्ती पाठोपाठ आता राजा हत्तीचा हैदोसाने गडहिंग्लज उपविभागात भितीची छाया कायम आहे. भय इथले संपत नाही अशीच अवस्था झाली आहे.
दोडामार्ग तालुक्यात व चंदगड वनक्षेत्र आणि पाटणे येथे ऐन सुगीत हत्तीची पुन्हा दहशत सुरू आहे. पिकांचे नुकसान होत आहे. गेली दोन दशके हत्तीच्या उपद्रवाने गडहिंग्लज उपविभागात शेतीसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हत्तीच्या हल्ल्यात डझनभर व्यक्तींचा मृत्यू तर शेकडो जण जायबंदी झाले आहेत. दरवर्षी हत्तींचा उपद्रव वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
माणुसकीचा अंत! नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीच्या अंगावर टाकला सुतळी बॉम्ब, हादरवणारी दृश्ये अन् Video Viral
दोडामार्गे वनक्षेत्रात दाखल
दोन्ही क्षेत्रांमध्ये गत अनेक महिन्यांपासून एकाही हत्तीचा वावर नाही, मात्र दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) येथून चंदगड वन क्षेत्रामध्ये या राजा टस्कर हत्तीने प्रवेश केला आहे. सध्या दोन दिवसांपासून उमगाव, जांबरे या गावाजवळील जंगल क्षेत्रात दिवसा मुक्काम करून रात्री शेती पिकामध्ये धुडगूस व गावाजवळ वावरअसा त्याचा दिनक्रम सुरू झाला आहे. उमगाव, जांबरे या गावांच्या परिसरातील १५ किलोमीटर क्षेत्रामध्ये या हत्तीचा प्रभाव आहे.
उतारावर अडकलं हत्तीचं पिल्लू, मुलाला वाचवण्यासाठी आई वडिलांनी असा जुगाड केला… पाहून सर्वच झाले खुश; क्युट Video Viral
ऐन सुगीत तालुक्यात राजा परतला
राजा टस्कर हा गतवर्षी सुगी संपल्यानंतर व उसाचा गाळप हंगाम संपल्यानंतर तळ कोकणात गेला होता. उन्हाळ्यात त्याचे खाद्य अपुरे पडत असल्याने तो तळकोकणात जाऊन चंदगडच्या सीमेपुढील दोडामार्ग जंगलात स्थिरावला होता. सुपारीची झाडे, माड खात तो घनदाट जंगलात वावरत होता. आता ऐन सुगी वेळीच तो चंदगड तालुक्यात परतला आहे. सध्या हत्तीकडून मोठे नुकसान सुरू झाले आहे.






