शिरोळ येथील विद्यार्थ्यांचे अनोखे रक्षाबंधन; विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या पोहोचल्या लडाख, चंदीगढ सीमेवर (फोटो सौजन्य- pinterest)
शिरोळ : जवानांसाठी येथील शालेय विद्यार्थ्यांनी ‘एक राखी भारतीय’ या राखी निर्मिती कार्यशाळेच्या उपक्रमांतर्गत पाचशेहून अधिक राख्या भारतीय सैनिकांसाठी पाठवल्या. तरूण पिढीमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना रुजून सैनिकांविषयी आदर वाढवण्यासाठी हा नाविन्यपूर्ण बहुआयामी उपक्रम विद्यालयामध्ये राबविण्यात आला.
रक्षाबंधनाच्या पवित्र सणाला भारतीय सैनिक देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबापासून दूर राहून रक्षण करतात. देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात, त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते, प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास स्वाभिमान ही वस्तुस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी सैनिकांना आपल्या गावी, घरी कोणते सण उत्सव साजरे होतात हे माहित असते परंतु याप्रसंगी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात.
विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेलच त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. ‘एक राखी जवानांसाठी…’ या उपक्रमांतर्गत राखी निर्मिती कार्यशाळा, राखी प्रदर्शन विक्री, सीमेवरील जवानांसाठी राखी व शुभेच्छा पत्र पोस्टाने रवाना असे वैविध्यपूर्ण उपक्रम विद्यालयामध्ये राबविण्यात आले.
या उपक्रमात विद्यालयात शरद पवार इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत सुरु असलेल्या हस्तकला मंचच्या प्रमुख सहाय्यक शिक्षिका वैशाली दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना राखी निर्मिती व प्रदर्शन तसेच जवानांसाठी राखी पाठवण्याबाबत मार्गदर्शन करून कृती करून घेतल्या. कार्यशाळेमध्ये तयार झालेल्या राख्यांचे प्रदर्शनही विद्यालयामध्ये भरविण्यात आले होते. त्यानंतर लेह लडाख व चंदीगढ या ठिकाणी सीमेवर कार्यरत भारतीय जवानांसाठी विद्यार्थी निर्मित राख्या व शुभेच्छा संदेश पत्रे पोस्टाने पाठविण्यात आली. तसेच शिरोळ नगरी व परिसरातील इतर गावामधील माजी सैनिक यांचा रक्षाबंधन सोहळा देखील विद्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे.