अक्कलकोट : राम हा आमच्याही अस्मितेचा विषय आहेच. तो विषय भाजपचाच नसल्याचा इशारा देत रामासोबत जनतेचे कामदेखील मोलाचे असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची अक्कलकोट तालुक्यात जनसंवाद यात्रा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही यात्रा चपळगाव येथे आली असता झालेल्या कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे, सरपंच वर्षा भंडारकवठे, शिवसेनेचे ठाकरे गटाचे आनंद बुक्कानुवरे, राष्ट्रवादी पवार गटाचे बंदेनवाज कोरबु, अश्पाक बळोरगी, शीतल म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, मल्लिकार्जुन काटगाव, मल्लिकार्जुन पाटील, सिध्दार्थ गायकवाड, विश्वनाथ भरमशेट्टी, अश्पाक अगसापुरे, माया जाधव, व व्यकंट मोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अक्कलकोट तुळजापूर या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी काम थांबले आहे. चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे. मोबदल्या संदर्भात शेतकरी व शासन असा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार व खासदारांनी योग्य ती भूमिका न घेतल्यामुळे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी केला.
याडीमाईंसोबत रंगपंचमी
दरम्यान, चपळगाव येथील याडीमाईंनी एकत्रित येऊन आमदार प्रणिती शिंदे यांना रंगपंचमीच्या निमित्ताने रंग लावला. शिंदे यांनी उपस्थित महिलांना रंग लावत राजकीय धुळवडीत सहभाग नोंदविला.
स्वतःच्या कामाचे श्रेय घ्या
सोलापुर-सिन्नुरच्या रस्त्याबाबत कोणी पाठपुरावा केला? त्यासाठी धडपड कुणाची? हे सगळं स्वतःला माहीत नाही. पण दुधनीच्या चौकात हा रस्ता माझ्यामुळेच झाल्याचा डिजिटल बॅनर लावणाऱ्या आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वतः केलेल्या कामाचे श्रेय घ्यावे, असा टाेला सिद्धाराम म्हेत्रे यांनी लगावला.