खराब हवामानाचा आंब्याला फटका (फोटो- सोशल मीडिया)
गुहागर तालुक्यात यावर्षी सुपारीचे पीक जोरात
खराब हवामानाचा आंब्याला फटका
बागायतदारांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ अशी स्थिती
दिनेश चव्हाण /गुहागर: गुहागर तालुक्यात यावर्षी सुपारीचे पीक जोरात आहे तर दुसरीकडे खराब हवामानाचा फटका बसलेल्या येथील हापूस आंब्याचे पीक मात्र धोक्यात आले आहे. सुपारी गुजरातला जाते तर आंबा पीक उशिराने असल्याने गुहागर तालुक्यातील या दोनही पिकांना सध्यातरी इराण-इस्त्राईल युध्दाचा कोणताही परिणाम जाणवलेला नसल्याने बागायतदारांमध्ये ‘कभी खुशी कभी गम’ अशी स्थिती झाल्याचे पहायला मिळत आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव अशा नैसर्गिक आपत्तीत सातत्याने सापडलेले गुहागर तालुक्यात सुपारीचे पीक यावर्षी भरघोस आले आहे.
सुपारी पिकासाठी प्रसिध्द असणारे तालुक्यातील पालशेत, वडद, गिमवी व काळसूरकौढर, गुहागर ही गावे ओळखली जातात. येथील बागायतदारांचे हमखास उत्पन्नाचे साधन म्हणून सुपारी पिकाकडे पाहिले जाते. तालुक्यातील एकट्या पालशेतमध्ये दरवर्षी सुपारीचे पीक ७० ते ८० टन होते. त्या पाठोपाठ वडद व गुहागचा नंबर लागतो. यावर्षी तालुक्यात विशेष करुन पालशेत व वडदमध्ये सुपारीचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे.
Alphonso Mango: आंबा, काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा; मंत्री नितेश राणे काय म्हणाले?
परदेशातील सुपारीची कमी दराने विक्री
सुपारीचे पीक कोकणात जास्त आहे. मात्र, थायलंडसारख्या देशातून व कर्नाटक राज्यातून ती स्थानिक बाजारपेठेत कमी दराने व्यापाऱ्यांना विकली जात असल्या स्थानिक बागायदारांच्या सुपारीचा उठाव होत नाही. दरवर्षी ४०० ते ५०० रुपन किलोने जाणारी यावर्षी ३८० दराने विकत घेतली जात आहे. त्यामुळे बागायतदारांन याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. खते, देखभाल, साफसफाई, सोलण्याच मजुरी आदी खर्च यातून सुटत नाही. त्यातच वानर, माकडांचा उपद्रव असल्याने य फळाचे मोठे नुकसान होत नाही.
आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार? “…प्रयत्न करू”; उदय सामंत
गुहागरची सुपारी वाशी मार्केटमधून थेट सुरतला जाते. त्यामुळे आखाती देशातील युध्दाचा कोणताही परिणाम निर्यातीवर होणार नसल्याचे सांगण्यात आले. याउलट या युध्दामुळे इतर देशातून दरवर्षी कोकणात येणारी सुपारी आली नाही तर स्थानिक सुपारीला मोठा दर मिळण्याची आशा बागायतदारांना असल्याचे पालशेतचे बागायतदार पंकज बिर्जे यानी सांगितले. यावर्षी हापूस आंबा पिकाने पाठ फिरवली असून हे पीकही उशिरा हाती येणार असल्याची माहिती वेळणेश्वरचे बागायतदार गोपाळ गोखले यांनी दिली.






