मानवी जीवनाचे आधारस्तंभ (फोटो- istockphoto)
मानवी जीवनातील एक मूलभूत घटक म्हणजे पेशी
हिमोग्लोबीन रक्तातील एक महत्त्वाचा लोहयुक्त प्रोटीन
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पेशींना ऑक्सिजन कमी पडतो
मिताली दंडगे/पुणे: मानवी जीवनातील एक मूलभूत घटक किंवा मजबूत पाया म्हणजे पेशी. या पेशींना अनेकवेळा कळत-नकळतपणे मदत करणारे काही जैवरेणू असतात. त्यातील एक म्हणजे प्रथिने अथवा प्रोटीन. ही प्रथिने अमिनो ऍसिड नावाच्या लहान घटकांपासून बनलेली असतात. मानवी शरीरात (Health News) हजारो प्रथिने असतात आणि त्यांचे कार्ये देखील बरीच असतात. उदा. चयापचय नियंत्रित करणे, पेशींची रचना आणि कार्य राखणे, रोगप्रतिकारक शक्तीच्या विकासात मदत करणे इत्यादी.
या प्रथिनांची विभागणी देखील त्यांची संरचना, कार्य, शरीरातील किंवा पेशीतील स्थान तसेच त्यांचे स्वरूप यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. यापैकी आज आपण काही महत्वाच्या प्रथिनांशी परिचय करून घेणार आहोत. आणि हाच या लेखामागचा उद्देश आहे.
१) हिमोग्लोबीन –
हा रक्तातील एक महत्त्वाचा लोहयुक्त प्रोटीन आहे. फुफ्फुसांमधून इतर अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हा प्रोटीन करतो. यातील लोहयुक्त संयुगामुळे रक्ताला लाल रंग प्राप्त होतो. योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळाल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी नियमित ठेवण्यात मदत होते. या प्रथिनाची प्रौढ पुरुष आणि महिला यांच्या मध्ये १४ ते १८ ग्रॅम प्रति डेसिलिटर आणि १२-१६ ग्रॅम प्रति डेसिलिटर अनुक्रमे इतकी योग्य पातळी मानली जाते. गरोदर महिला आणि बालकांमध्ये ही पातळी वेगळी असते.
शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
समस्या-
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरेश्या प्रमाणात पोहोचत नाही. कमी ऑक्सिजन मुळे डोळ्यात आणि चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसून येतो. सतत अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो. श्वास घेताना त्रास होऊन थोडे काम करून सुद्धा वारंवार धाप लागते.
कारणे –
आहारातील लोहाची कमतरता, व्हिटॅमिन बी १२ किंवा बी ९ ची कमतरता, मासिक पाळी किंवा जखम झाल्याने होणारा अतिरक्तस्राव,आणि अनुवांशिक विकार उदा. सिकलसेल ॲनिमिया. इत्यादी.
उपाय-
काही संशोधनातून असे लक्षात येते की या प्रथिनाची योग्य पातळी राखण्यासाठी आहारात लोहयुक्त आणि व्हिटॅमिन सी युक्त फळे, भाज्या असाव्या ज्यामुळे लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत मदत होते. उदा. डाळिंब, पालक, बीट, कडधान्ये, खजूर.
२) इन्सुलिन –
स्वादुपिंडातील बीटा पेशीतून स्त्रवणारा हा प्रोटीन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत करतो. इन्सुलिन पेशींना ग्लुकोज शोषून घेण्यास मदत करते, ज्याचा वापर शरीर ऊर्जा निर्माण करण्यासाठी करते.
समस्या –
संशोधनानुसार एक ठळक बाब स्पष्ट होते की जेव्हा स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा काही बाबींमुळे आपले शरीर त्याचा वापर करू शकत नाही तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढून डायबिटीस आजाराचा धोका वाढतो. तसेच आळस आणि लठ्ठपणा असे दुष्परिणाम देखील दिसून येतात.
कारणे –
सुरुवातीला टाइप २ मधुमेहात इन्सुलिन प्रतिरोध असतो, पण कालांतराने जेव्हा स्वादुपिंड थकते, तेव्हा इन्सुलिनचे उत्पादन कमी होते.
परंतू, टाइप १ मधुमेह हा एक ऑटोइम्यून आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकीने स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशी नष्ट करते. यामुळे शरीर इन्सुलिन तयार करणे पूर्णपणे बंद करते किंवा खूप कमी करते. तसेच औषधांचे दुष्परिणाम, व्यायामाचा अभाव, अतिप्रमाणात साखर असलेला आहार, अनुवंशिक मधुमेहाचा इतिहास इत्यादी कारणे देखील असतात.
उपाय –
याची पातळी नैसर्गिकरीत्या जपण्यासाठी कमी ग्लाईसेमिक इंडेक्स असलेला आहार आणि नियमित व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
३)अँटिबॉडिज-
हे प्रोटीन शरीराचे संरक्षक सैनिक असतात. ही प्रथिने रोगप्रतिकारक शक्तीचे महत्वाचे घटक असून शरीरात हळुवारपणे शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बॅक्टेरिया, व्हायरस सारख्या बाह्य आणि हानिकारक पदार्थांना ओळखून त्वरित नष्ट करतात. यांना इम्मुनोग्लोब्युलिन असे देखील म्हटले जाते. याचे अनेक प्रकार आणि कार्ये असतात.
समस्या –
याच्या कमतरतेमुळे शरीरात एखादी जखम लवकर बरी न होणे, वारंवार आजारी पडणे, थकवा आणि काही वेळा गंभीर असे ऑटोएम्म्युन आजार देखील तयार होऊ शकतात.
कारणे –
काही लोक जन्मतःच अशा आजारासह जन्माला येतात, जिथे त्यांचे शरीर पुरेसे अँटीबॉडीज तयार करू शकत नाही. तसेच कर्करोगामुळे अँटीबॉडी तयार करणाऱ्या पेशी कमी होऊ शकतात.
एचआयव्ही, हिपॅटायटीस यांसारख्या गंभीर संसर्गांमुळे देखील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. इम्युनोसप्रेसंट्स च्या विशिष्ठ प्रमाणात वापर केल्यावर देखील अँटिबॉडिज कमी प्रमाणात दिसून येतात.
उपाय –
संशोधनानुसार नियमित व्यायाम, योग्य आहार आणि वेळ पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने त्वरित उपचार करणे गरजेचे असते.






