फोटो सौजन्य - Social Media
चिपळूण : संस्थांना उभारी देण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे म्हणजे त्या संस्थेच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासारखे आहे. भाजप चिपळूण शहर मंडलाने आयोजित केलेला सत्कार सोहळा हा त्याच भावनेतून प्रेरित असून तो निश्चितच कौतुकास्पद उपक्रम आहे, असे मत चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त तसेच माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात दै. नवराष्ट्रतर्फे सुभाषराव चव्हाण यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल तसेच सीईओ सौ. स्वप्ना यादव यांना ‘बेस्ट सीईओ’ पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना चव्हाण यांनी भाजप शहर मंडलाच्या कार्याचे कौतुक करताना, समाजात सकारात्मक काम करणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, स्मिताताई चव्हाण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक मकरंद जोशी, नॅब आय हॉस्पिटलचे अध्यक्ष निलेश भुरण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारतीय जनता पक्ष नेहमीच कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करत आला आहे. समाजासाठी कार्य करणारे हे मान्यवरच खरे प्रेरणास्थान असून त्यांच्या कार्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे पक्ष समाजातील कार्यकर्त्यांचा गौरव करत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, सीईओ सौ. स्वप्ना यादव, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मकरंद जोशी, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक रत्नदिप देवळेकर, प्रशांत देवळेकर, समीर टाकळे, अतुल चितळे, अमोल भोबस्कर, निलेश भुरण, महेंद्र कानडे, संजीव खरे, आशीष जोगळेकर, सागर गांधी, राजीव कानडे, तुषार गोखले, समृद्धी देवळेकर, ऋतुजा कदम, इशा दांडेकर, धनश्री बापट, मंजुषा चितळे आणि सारिका भावे यांचा समावेश होता.
कार्यक्रमात मंगेश तांबे यांनी हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे नमूद केले, तर ऋतुजा कदम हिने या सन्मानामुळे भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा परिषद सदस्या दिप्ती महाडिक, महिला मोर्चा अध्यक्षा आदिती गुडेकर, नगरसेविका अंजली कदम, रसिका देवळेकर, विजय चितळे, रामदास राणे, शीतल रानडे, निनाद आवटे, जतिन घटे, अश्विनी वरवडेकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पालकर आणि निखिल किल्लेकर यांनी केले, तर अभय चितळे यांनी आभार प्रदर्शन केले.






