सौजन्य - नवराष्ट्र टीम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साखर उद्योगाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत साखर उद्योगासमोरील आर्थिक आणि धोरणात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी साखरेचा किमान विक्री दर वाढविणे, बी-हेवी मोलॅसिस व सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे दर वाढविणे, पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविणे, साखर कारखान्यांच्या कर्जावरील व्याजमाफी, ऊस विकास निधीतील कर्जांसाठी एकरकमी परतफेड योजना, हार्वेस्टर यंत्रांसाठी अनुदान तसेच बायोगॅस आणि मल्टीफीड डिस्टिलरी प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या मागण्या मांडल्या.
बारा वर्षांची परतफेड मुदत देण्याची मागणी
तसेच साखर कारखान्यांच्या विविध बँकांकडील कर्जांचे पुनर्गठन करून दोन वर्षांचा स्थगिती कालावधी व बारा वर्षांची परतफेड मुदत देण्याची मागणीही करण्यात आली. यावर राज्य सरकारने हमी देऊन प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे अमित शहा यांनी स्पष्ट केल्याचे पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






