३ महिन्याचे रेशन मिळणार आता एकत्र! पुरवठा विभागाचा पुढाकार; पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरिबांना सुविधा
महिन्याच्या ठराविक तारखेलाच रेशनचे धान्य मिळते. मात्र आगामी पावसाळ्याचे दिवस पाहता पुरवठा विभागाने ३ महिन्याचे धान्य एकत्र वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील रेशन लाभार्थ्यांना एप्रिल महिन्यातच एप्रिलसह मे आणि जून महिन्याचेही धान्य मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.(फोटो सौजन्य – AI)
स्वस्त धान्याचे लाभार्थी हे प्रामुख्याने खेड्यापाड्यात राहणारे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात एकतर शेतीची कामे वाढलेली असतात. त्यामुळे रेशनच्या रांगेत उभे राहणे त्यांच्यासाठी कठीण जाते. शिवाय, सतत पाऊस पडत असल्यास धान्य आणणेही मुश्कील बनते. ही अडचण लक्षात घेता पुरवठा विभागाने मे आणि जून महिन्यातील धान्य एकत्रच वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यातही असे एकत्र वाटप करण्यात आले होते. जिल्ह्यातील रेशन लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी तीन महिन्यांचा धान्यसाठा प्राप्त झाला आहे.
तीन महिन्यांचे रेशन धान्य एकत्रच वाटप करण्याच्या निर्णयासोबतच पुरवठा विभागाने रेशन लाभार्थ्यांना मोफत साड्या वाटप करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रती रेशन कार्ड एक साडी या प्रमाणात हे वाटप होणार आहे. एखाद्या शिधापत्रिकेवर दोन किंवा तीन महिलांची नावे असली तरी एकच मोफत साडी मिळणार आहे. या साड्या केवळ अंत्योदय कार्ड असलेल्या लाभार्थ्यांनाच वाटप होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १ लाख ३५ हजार ३६२ कार्डधारकांना या साड्या मिळणार आहेत. यापूर्वीही पुरवठा विभागाने अशा साड्या वाटप केल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यासाठी प्रती साडी १०० रुपये दर ठेवण्यात आला होता. शिवाय खराब साड्या मिळाल्याची ओरडही झाली होती. मात्र यावेळी पूर्णपणे मोफत साडी दिली जाणार आहे. त्यातही साडी फाटकी किंवा खराब निघाल्यास ती बदलून दिली जाईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संघपाल मेश्राम यांनी दिली.
Amravati News : 102 टक्के पाऊस; तरीही ‘या’ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; वाढते तापमान आणि घटते भूजल
गोदामांपर्यंत आलेल्या या धान्याचे आता रेशन दुकानदारांना वितरण सुरु करण्यात आले आहे. आता ते प्रत्यक्ष रेशन दुकानातून लाभार्थ्यांना वाटप केले जाणार आहे. हे वाटप ई-पॉस मशिनद्वारे करणे बंधनकारक आहे. त्यामुळे तीन महिन्याच्या धान्याचे वाटप करताना रेशन दुकानदारांनाही बनवाबनवी करण्याचा वाव उरलेला नाही. गॅस टंचाईला केरोसीनचा पर्याय जिल्ह्यात सध्या गॅसटंचाई निर्माण झाली असून विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने रेशन कार्डवर केरोसीन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्याला १ लाख ४४ हजार केएल केरोसीनचे नियतन मंजूरही करण्यात आले आहे. आता लवकरच प्रतीकार्ड तीन लिटर केरोसीन वितरण केले जाणार आहे.






