फोटो सौजन्य- प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांच्या दृष्टीने लोकांमध्ये जा. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. लोकांमध्ये विश्वास निर्माण करा.कार्यकर्ते निर्माण करा. नव्या जोमाने कामाला लागा. तरच तुम्हाला निवडणुका सोप्या होतील. जिथं तुम्हाला सहकार्य अपेक्षित आहे, तिथे आम्ही असू काळजी करू नका. माझी निवडणूक झाली म्हणून बाजूला होणार नाही. कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी सोबत राहणार आहे. महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी हॉटेल अभिरुचीच्या सभागृहात पक्षाच्या आयोजित बैठकीत दिली.
यावेळी माजी आमदार रमेश कदम, चिपळूण तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, शहराध्यक्ष रतन पवार, महिला आघाडी तालुकाध्यक्षा राधा शिंदे, माजी नगरसेवक शिरीष काटकर, ओबीसी सेल चिपळूण तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, दत्ता पवार, सेवादल जिल्हाध्यक्ष अन्वर जबले, गुहागर विधानसभा क्षेत्राध्यक्ष योगेश शिर्के, ऍड. नयना पवार, युवकचे तालुकाध्यक्ष रोहन नलावडे आदी उपस्थित होते.
पुढच्या काळात कार्यकर्ते जास्त तयार व्हायला पाहिजेत
यावेळी पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीच्या दृष्टीने आपले मनोगते मांडली. तर प्रशांत यादव यांनी आपल्या मनोगतात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह वरीष्ठ नेते व तुम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी उभे राहिलात. यामुळे कमी कालावधीत देखील आपण चांगली लढत देऊ शकलो. तरीही आपण सर्वांनी खचून न जाता आगामी निवडणुकांच्या दृष्टीने माजी आमदार रमेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागुया, असे आवाहन करतांना आपल्याकडे नेते जास्त कार्यकर्ते कमी तेव्हा पुढच्या काळात कार्यकर्ते जास्त तयार व्हायला पाहिजेत. एकमेकांना मान सन्मान द्या. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यादव यांनी विश्वास दिला.
प्रशांत यादव यांना दुसऱ्यावेळी यश नक्कीच मिळेल
तर माजी आमदार रमेश कदम यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, संघटन वाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया! विधानसभा निवडणुकीत कमी कालावधी मिळाला. परंतु आपण चांगली लढत दिली. कोणत्या चुका झाल्या आहेत, हे आमच्या लक्षात आले आहे. समोरच्या उमेदवाराने गेली दहा वर्षे काम केले होते. ते सुखदुःखात सहभागी होत आले आहेत. आम्ही २५ हजार मताधिक्याची तयारी केली असती तर विजय नक्कीच असता. मात्र, आता पुढील निवडणुकांच्या दृष्टीने गाव निहाय दौरे करून संघटन करूया. येत्या पाच वर्षात राजकीय परिस्थिती तीच राहील हे माहीत नाही. परंतु आपले संघटन असणे आवश्यक आहे. पहिल्या निवडणुकीत मला अपयश आले होते. दुसऱ्या निवडणुकीत यश मिळाले. तसे प्रशांत यादव यांना दुसऱ्यावेळी यश नक्कीच मिळेल, असा आशावाद यादव यांच्या विषयी रमेश कदम यांनी यावेळी व्यक्त केला. जिद्द ठेवा पुढच्या काळात आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे. या निवडणुकीत तुमच्याकडून चुका झाल्या नाहीत तर आमच्याकडून झाल्या आहेत त्या नक्कीच सुधारण्यासाठी प्रयत्न करू! अशी ग्वाही रमेश कदम यांनी यावेळी दिली.
यावेळी सतीश खेडेकर, सीताराम शिंदे, वासुदेव मेस्त्री, दिनेश शिंदे, माजी नगरसेवक अविनाश केळसकर, हिंदुराव पवार, संजय गमरे, फैसल पिलपिले, जनार्दन पवार, रुपेश आवले, शमून घारे, सचिन मोहिते, तसेच महिला पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.