रत्नागिरी विमानतळाच्या कामाला गती (फोटो- istockphoto)
वारंवार विमानतळाला भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदार कंपन्यांकडून अधिक वेगाने आणि दर्जात्मक काम करून घेतले जात आहे. अशा प्रकारे प्रशासनाकडून विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच टर्मिनल इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने आता प्रवासीसेवा, सुरक्षा यंत्रणा व आवश्यक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर दिला जात आहे. टर्मिनल इमारतीमधून प्रवाशांना थेट विमान धावपट्टीकडे (रनवे) जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने लवकरच सुरक्षाभिंत तोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या तांत्रिक कामांनंतर टर्मिनल बिल्डिंग आणि धावपट्टी यांमधील संपर्क सुलभ होणार असून, प्रवाशांच्या वाहतुकीचा मार्ग मोकळा होईल. धावपट्टीचे मजबुतीकरण आणि रात्रीच्या वेळी विमानांचे लैंडिंग सुलभ व्हावे यासाठी ‘नाईट लडिंग’ सुविधेच्या कामांनाही गती देण्यात आली आहे. यामुळे विमानांचे आगमन आणि उड्डाण अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.
संबंधित सर्व प्रशासकीय विभाग आणि कंत्राटदार संस्था उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. सर्व तांत्रिक चाचण्या यशस्वी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून अंतिम मंजुरी मिळवून विमानसेवा सुरू करण्याचे प्रशासनाचे उदिष्ट आहे. कोकणातील पर्यटन, उद्योग आणि व्यापार क्षेत्राला बूस्टर डोस देण्यासाठी रत्नागिरी विमानतळ अत्यत महत्वाचे मानले जात आहे. विमानतळ पूर्णक्षमतेने सुरू झाल्यानंतर मुंबई, पुणे आणि देशातील इत्तर प्रमुख शहरांशी रत्नागिरीची बेट कनेक्टिविटी प्रस्थापित होईल, यामुळे स्थानिक उद्योजकांना नदा बाजार उपलब्ध होईल आणि वाहतुकीचा वेळ वाचण्यासदेखील मदत होऊ शकणार आहे.
पर्यटन वाढणार
कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. हवाई प्रवासामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार असल्याने पर्यटन व्यवसायाला नवी दिशा मिळेल. तसेच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार असून, टॅक्सी सेवा, हॉटेल्स आणि इतर व्यवसायांना मोठा फायदा होईल.






