मुंबई: मुंबईत घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकजण बघत असतो. जेव्हा घर घ्यायची वेळ येते तेव्हा आयुष्याची सगळी बचत आपण त्या घरासाठी वापरतो. मात्र घराच्या किमतीमुळे अनेकदा घर घेणं परवडत नाही. त्यामुळे अनेकांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. मात्र, गेल्या काही वर्षापासून सामान्य मुंबईकराचं (Mumbai) घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम म्हाडा करत आहे. म्हाडाकडून मुंबईकरांना स्वस्तात चांगली घरं दिली जात आहेत. यावेळीही म्हाडाने (Mhada Lottery Mumbai) घरांची सोडत काढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 4 हजार 83 घरांची सोडत म्हाडा काढणार आहे. (Mhada Lottery 2023)
18 जुलै रोजी काढण्यात येणार सोडत
म्हाडा विविध उत्पन्न गटासाठी 4083 घरांची सोडत काढणार आहे. आजपासून (22 मे) या घरांसाठी नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरणे आणि स्वीकृतीला 22 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता घरांची सोडत काढली जाणार आहे. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात 18 जुलै रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.
सदनिकांची एकूण संख्या – 4083
-अत्यल्प गटासाठी सदनिकांची संख्या – 2790
-अल्प गटासाठी सदनिकांची संख्या – 1034
-मध्यम गटासाठी सदनिकांची संख्या – 139
-उच्च गटासाठी सदनिकांची संख्या – 120
अर्ज भरायचा कुठे?
https://housing.mhada.gov.in
https://www.mhada.gov.in
याच संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक अर्जदारांनी अर्ज भरण्याकरिता या संकेत स्थळांचा वापर करावा. तसेच ॲण्ड्रोइड मोबाइल फोनवर प्ले स्टोर आणि ॲपल मोबाइल फोनवर APP स्टोरमध्ये सोडत प्रणालीचे मोबाइल ॲप्लिकेशन MHADA HOUSING LOTTERY SYSTEM इच्छुक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहे.