"एसटी बस स्थानकांमधील गैरसोयी तातडीने दूर करा", मनीषा कायंदे यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी (फोटो सौजन्य-X)
मुंबई : राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकांमध्ये महिला, मुले, जेष्ठ नागरिक व सामान्य प्रवाशांकरिता प्रचंड गैरसोयी असल्याच्या शिवसेना महिला आघाडीने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. महिला आघाडीने २० जिल्ह्यांमधील ८७ बस स्थानकांची पाहणी केली. शिवसेना आमदार डॉ. मनिषा कायंदे आणि उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा अहवाल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सादर करण्यात आला. बस स्थानकांमधील गैरसोयी तातडीने दूर करण्याची मागणी महिला आघाडीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे यावेळी केली.
शिवसेना महिला आघाडीच्या प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी २५ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२५ दरम्यान २० जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या ८७ बसस्थानकांना अचानक भेटी देत पाहणी दौरे केले होते. या दरम्यान बस स्थानकांमधील महिला कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी स्वच्छता गृहे, हिरकणी कक्ष, पिण्याचे स्वच्छ पाणी, २४ तास सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे व नियंत्रक कार्यालयात स्क्रीन, पुरेशी लाईट व्यवस्था तसेच पोलिसांची नियमित गस्त याविषयी माहिती घेण्यात आली. जवळपास सर्वच बस स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसोयी दिसून आल्या.
या संदर्भात राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन निवेदने देण्यात आल्याचे शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सांगितले. या निवेदनांच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही करण्याबरोबरच बसस्थानकांवर प्रवाशांना तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केल्याचे आमदार कायंदे यांनी म्हटले आहे.
१) महिला प्रवाशांसाठी स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृहे / शौचालये: अनेक स्थानकांमध्ये महिला प्रवाशी तसेच स्थानिक कार्यरत महिला कर्मचारी व आधिकाऱ्यांसाठी सुद्धा स्वच्छ व सुरक्षित शौचालये व स्वच्छता गृहे नाहीत, असलेली स्वच्छतागृहे अत्यंत दुरावस्थेत आहेत /वापरण्यायोग्य नाहीत.
२) स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष: अनेक स्थानकांमध्ये बाळंणतीन/ लहान बाळासह प्रवास करणाऱ्या महिला प्रवाश्यांना नीटनेटका हिरकणी कक्ष नाही. सदर कक्षामध्ये स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.
३) दिव्यांग प्रवाश्यांसाठी प्रवेश/प्रतिक्षेबाबत सोयी सुविधा: अनेक स्थानकांमध्ये प्रवेशद्वारावर रॅम्प व रेलिंग नसल्याने विकलांग प्रवाशांना प्रवेश करताना मोठा मनस्ताप होतो.
४) पिण्याच्या पाण्याची सोय: रा.प.महामंडळाच्या कर्मचारी/अधिकाऱ्यांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आवश्यक स्वच्छ पिण्याचे पाणी अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी पाण्याचे लावलेले फिल्टर वेळेवर स्वच्छ केले जात नसल्याने पिण्यायोग्य पाणी नसल्याचा तक्रारी आहेत.
५) महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी स्वच्छ व सुरक्षित विश्रांतीगृह व कार्यालयीन जागा: अनेक स्थानकात स्थानिक कार्यरत महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी कामासाठी व विश्रांतीसाठी पुरेश्या जागा नाहित. महिला कर्मचाऱ्यांद्वारे स्वच्छ व सुरक्षित जागा उपलब्ध करण्याची मागणी आहे.
६) विशाखा समिती/समितीची माहिती: अनेक ठिकाणी समित्या आहेत. समित्यांची माहिती दर्शनी भागात लावून वेळोवेळी दाखल तक्रारींची दखल घेण्याबाबत निर्देश व्हावेत.
७) स्थानकांमध्ये रात्रीच्या वेळी पुरेशी लाईट: अनेक स्थानकांमध्ये रात्रीच्या वेळी पुरेशी लाईट नसल्यामुळे त्याठिकाणी अनेक अवैध प्रकार घडत असून सर्व बसस्थानकांमध्ये विद्युतीकरणाचा आढावा घेत आवश्यक तिथे विद्युतीकरण करणे गरजेची आहे.
८) स्थानकात सुरक्षा रक्षक असणे: अनेक स्थानकांमध्ये रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात बसेस व प्रवासी वाहतूक सुरु असताना सुरक्षा रक्षक नसणे किंवा एक किंवा दोन सुरक्षा रक्षक असल्याने सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होतो.
९) स्थानक परिसरात पोलीस गस्त: पोलीस गस्त किंवा कायमस्वरूपी पोलिसांची सुरक्षा नसल्याने अनेक ठिकाणी अवैधरित्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ व दलालांचा सुळसुळाट आहे. जुगार व मटक्याचे अड्डे देखील याच परिसरात राजरोसपणे चालवले जातात. अनेक भागात दारुड्यांचा व गर्दुल्यांचा वावर आहे. परिणामी महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे आढळले.
१०) स्थानक परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा: राज्यातील अनेक स्थानकांमध्ये पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा व स्क्रीन नाहीत. परिणामी झालेल्या गैरप्रकारावर कारवाई करताना अडचणी निर्माण होतात. पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे व किमान ३ महिन्यांचा रेकॉर्ड डाटा सुरक्षित ठेवण्याची यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. सदर मागणीची तत्काळ योग्य ती दखल घेत कार्यवाही करणेबाबत निर्देश देण्याची विनंती.






