खासदार संजय राऊत यांनी मुंबईतील बेस्टच्या निकालावर प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
Sanjay Raut Marathi News : मुंबई : पहिल्यांदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे लढलेल्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक २०२५ मध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव झाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र निवडणूक रिंगणात उतरले होते, परंतु त्यांच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. हा निकाल ठाकरे गट आणि मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विशेषतः अशा वेळी जेव्हा दोन्ही पक्ष आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याची तयारी करत आहेत. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांनी बेस्टच्या निकालापासून ते अनभिज्ञ असल्याचे सांगितले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “बेस्टच्या पतपेढीच्या निकालावर जिंकलं कोण? माझ्याकडे खरोखर माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही. मी काहीच माहिती घेतली नाही. मला माहितच नाही,” अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “ही एका पतपेढीची निवडणूक आहे. मला माहितच नाही या विषयावर. या स्थानिक निवडणुका असताता. मला खरोखरच माहित नसेल तर प्रश्न विचारु नका. मी माहिती घेऊन बोलेन. पतपेढ्यांच्या निवडणुका या ट्रेड युनियनच्या असतात. ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात, तिथे बऱ्याच काळापासून शरद राव याची युनियन आहे. त्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त होती,” असे देखील मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही
ठाकरे बंधू हे पहिल्यांदाच एकत्रित निवडणूक लढले होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्रित येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी ही बेस्टची निवडणूक चाचणी मानली जात होती. मात्र यामध्ये ठाकरे बंधूंना एकही जागा न मिळाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. याबाबत राऊत म्हणाले की, “ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे परीक्षा नाही. चाचणी परीक्षा नाही. या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत. फार मोठं यश कोणाला मिळालय अस मला वाटत नाही. आमचे जे लोक या निवडणुकीत होते, त्यांना तुम्ही विचारा,” असे स्पष्ट मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार असून एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एनडीएकडून विरोधातील काही नेत्यांना मतांसाठी संपर्क करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत राऊत म्हणावे की, “उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकीत एनडीएकडे बहुमताचा आकडा आहे. त्यांच्याकडे बहुमत असतानाही दिल्लीतल्या अनेक प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीतल्या नेत्यांना फोन करुन राधाकृष्णन यांना मतदान करण्याची विनंती केली. जर तुमच्याकडे बहुमत आहे, मग फोन का करावा लागतो?. याचा अर्थ तुमचं बहुमत अस्थिर चंचल आहे. म्हणून तुम्हाला उपरराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांच्या नेत्यांना फोन करावे लागतात. ही अक्कल तुम्हाला आधी यायला पाहिजे होती. उमेदवार ठरवताना. सर्व पक्षांशी चर्चा केली असती, तर सर्वसंमतीने नाव ठरवता आलं असतं,” अशी भूमिका खासदार राऊत यांनी घेतली आहे.