65 बेकायदा इमारतीमधील रहिवाशांचे आझाद मैदानात धरणे आंदोलन (फोटो सौजन्य-X)
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवाशांनी महापालिका प्रशासनाने घरे खाली करण्याच्या नोटीस पुन्हा पाठविल्या आहेत. या विरोधात दाद मागण्याकरीता इमारतीमधील रहिवासी १५ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करून राज्य सरकारचे या प्रकरणी लक्ष वेधणार आहेत.
महापालिकेच्या बनावट सही शिक्क्यांचा वापर करुन बेकायदा इमारती बांधणाऱ्या बिल्डरांनी ६५ बेकायदा इमारती उभ्या केल्या. या इमारतीमधील घरे नागरीकांना विकली आणि त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. महापालिकेची बनावट बांधकाम परवानगी तयार करुन रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळाविले. ६५ बेकायदा प्रकरणाचा पर्दाफाश वास्तूविशारद संदीप पाटील यांनी केला. त्यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
१९ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यायालयाने महापालिकेस ३ महिन्याच्या आत या इमारती पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयाने रहिवाशांना काही अंशी दिलासा दिला. इमारती नियमितीकरणाची मुभा दिली. त्यासाठी इमारत धारकांनी प्रस्ताव पाठविले. ते प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना विभागाने फेटाळून लावले. हे प्रस्ताव अपूर्ण होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ६५ बेकायदा इमारतीमधील नागरीकांना बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. त्यापश्चात याचिकाकर्ते पाटील यांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याने कायदेशीर नोटीस बजावली. त्यानंतर पुन्हा महापालिकेने इमारतीमधील नागरीकंना नोटीस बजावल्या. या कारवाईच्या विरोधात रहिवासी १५ जुलैला आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहे.
रहिवासी अर्चना बाणकर यांनी सांगितले की, त्यांचे सासरे स्वातंत्र्य सेनानी आहे. त्यांच्या आयुष्याची जमापुंजी घरासाठी लावली. आत्ता तेच घर बेकायदा ठरविल्याने आम्ही जाणार कुठे? राहणार कुठे? आणि आम्ही करायचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. द्रौपदी हायईटस या इमारत राहणारे भावेश शिंदे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. त्या पश्चात महापालिकेने पुन्हा आम्हाला घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय झाले ? असा आमचा सवाल आहे.
शिवलिला इमारतीत राहणारे दिनेश देवाडी यांनी सांगितले की, आमच्या इमारतीला नोटीस बजावली आहे. माझी मुलगी इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकते. आम्ही बेघर झालो तर माझ्या मुलीचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत येणार आहे. त्यामुळे बाधितांनी १५ जुलैच्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त संख्यने सहभागी व्हावे. नोटीस मिळालेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या संगिता नायर यांनी सांगितले की, माझे पती हयात असताना त्यांनी कर्ज काढून घर घेतले. बेकायदा इमारत असल्याचा धसका घेऊनच माझ्या पतींचे निधन झाले. आत्ता त्यांच्या पश्चात मला घर खाली करण्याची नोटीस महापालिका पाठविते. घर जाणार आहे. तर मी बँकेचे हप्ते कुठून भरु असा माझ्या समोर प्रश्न उभा ठाकला आहे.