नवी मुंबई/ सावन वैश्य : आरोपींना कायद्याचा धाक राहिलाय का ? शहरातील सुरक्षा एरणीवर आली असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. जामिनावर सुटलेल्या एका गुन्हेगाराने चक्क पोलीसांवर हल्ला केल्याने घटना नवी मुंबईत घडली आहे.
पनवेलमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील जामीनावर सुटलेल्या आरोपीने पनवेल शहर पोलिसांवर हल्ला केला आहे. आरोपी सोबन बाबुलाल महातो, हा आठवडाभरापूर्वीच जामीनव सुटला होता. प्रॉपर्टीच्या वादातून कोयत्याचा धाक दाखवून परिवाराला धमाकावत होता. तसेच आरोपीने स्वतःच्या 16 वर्षीय पुतणीच्या गळ्यावर कोयता ठेवून ओलीस ठेवले होते. पोलीस व अग्निशमन दलाने मोठ्या शिताफीने आरोपी सोबन महातो याला ताब्यात घेतले आहे.
आरोपी सोबन महातो हा 2018 सालच्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. आठवडाभरापूर्वीच सोबन हा जामीनावर सुटून आला होता. सोबन व त्याच्या परिवाराचा प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद सुरू होता. त्याच वादातून त्याने परिवाराला कोयता व कुऱ्हाडीच्या साह्याने धमकावत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पनवेल शहर पोलीस व अग्निशमन दल या दोघांनी घटनास्थळी धाव घेतली, व त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबन याने पोलीस पथकावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात रवींद्र पारधी व सम्राट डाकी या दोन पोलीस अंमलदारांना दुखापत झाली. आरोपी इथेच न थांबता त्याने स्वतःच्या 16 वर्षीय पुतणीच्या गळ्यावर कोयता ठेवून तिला ओलीस ठेवले. अखेर पोलिसांनी चिली स्प्रे मारून आरोपीला अटक केली आहे. व नातेवाईकांची सुटका केली आहे.
आरोपीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोनही पोलीस अंमलदारांना, उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर बीएनएस व भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे करत आहेत.