पुरंदर तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेचा पुरता बोजवारा (फोटो- istockphoto/टीम नवराष्ट्र)
सासवड : पुरंदर तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सामान्य जनता न्याय मिळण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वर्षनुवर्षे चकरा मारीत असताना अधिकारी मात्र मुग गिळून गप्प आहेत करू, बघू याच भूमिकेत असताना बेकायदेशीर धंदेवाले मात्र सुसाट चालले आहेत. भूमीअभिलेख अधिकारी पैसे घेवून कोणाच्याही नोंदी कोणाच्या नावावर करीत असून महसूल विभागाने कळसच केला आहे. भू माफियांना महसूल अधिकाऱ्यांचा आशीर्वाद मिळाल्याने दिवसरात्र उत्खनन सुरु असून दररोज मुरूम, खडीची ट्रक ने बेकायदेशीर वाहतूक सुरु आहे. अधिकारी मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी सर्व सामान्य जनतेसाठी कि दोन नंबर वाल्यांसाठी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील वर्षी पुरंदर तहसील कार्यालयातून एव्हिएम मशीनची चोरी झाल्याची घटना घडली होती. यात प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत, भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक संतोष जाधव तसेच एक सहायक फौजदार, एक होमगार्ड असे वरिष्ठ स्तरावरील सर्व अधिकारी निलंबित करण्यात आले होते. काही कालावधी नंतर प्रांताधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा मूळ जागेवर नियक्ती देण्यात आली. त्यानंतर पुरंदरचे प्रशासन व्यवस्थित चालेल असे जनतेला वाटले होते. मात्र त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांचा गाड्या सुसाट सुटल्या असून सर्व कारभार बंद दरवाजा आडून बिनबोभाट सुरु आहे. नागरिकांना वेट यंड वाच असे सांगितले जात असून ठेकेदार, एजंट, भू माफिया, बेकायदेशीर धंदे करणारे व्यावसायिकाना मात्र कोणतेही बंधन नाही असे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा: चोरट्याने ‘ॲपल’चे घड्याळ चोरले अन् घबाडच…; सासवड पोलिसांची धडक कारवाई
प्रांताधिकारी, तहसीलदार आणि भूमी अभिलेख तर केवळ कागदी गोडे नाचविण्यात तरबेज असल्याचे दिसत आहेत. पुरंदरच्या पश्चिम भागातील भिवरी येथे भू माफिया हजारो ट्रक मुरूम, माती दिवसरात्र उत्खनन करून नेत असताना अधिकारी मात्र खुलेआम डोळेझाक करीत आहेत. गावातील सुभाष महादू कटके यांनी याबाबत प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी पत्र आणि उत्खननाचे व्हिडीओ, फोटो देवूनही अधिकारी गप्प आहेत. केवळ समाधानासाठी पंचनामा केला खरा, पण कित्येक दिवस होवूनही कारवाई काही केली नाही. विशेष म्हणजे ज्या क्षेत्राबाबत न्यायालयात खटला सुरु आहे आणि तहसील कार्यालयात सुद्धा अर्ज असताना अधिकारी थातूर मातुर उत्तरे देवून अर्जदारालाच वारंवार चौकशीच्या पिंजऱ्यात उभे करीत आहेत.
पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील सुभाष कटके यांनी सांगितले कि, शेतजमीन गट नं. ७६९ आणि ७७० त्यांच्या मालकीचे असून त्यामधून मारुती भैरू कटके यांनी अनधिकृतपणे रस्त्याचा वापर केला. तसेच मारुती भैरू कटके यांच्यासह जगन्नाथ एकनाथ गोफणे आणि गणपत एकनाथ गोफणे यांनी गट नं. ७६८, ७६९ आणि ७७१ मधून तब्बल २० हजार ब्रास पेक्षा जास्त मुरूम काढून नेला आहे अशी तक्रार त्यांनी गाव कामगार तलाठी आणि तहसीलदार यांचेकडे केली. त्यानुसार पंचनामा केला असता १३५ फुट रुंद, ३९६ फुट लांब आणि १२ फुट उंचीचे उत्खनन करून त्यामध्ये केवळ ६४१५ ब्रास मुरूम नेल्याचे दाखविले. तसेच याबाबत वेळोवेळी सुनावण्या घेवून कागदपत्रासह तहसील कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर संपूर्ण २३ आणि २४ चे वर्ष गेले तरी कोणतीही कारवाई नाही तरी प्रशासनाने तातडीने कारवाई करून उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून वाहने जप्त करावीत. आणि नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी सुभाष कटके यांनी केली आहे.
महसूल अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर धंद्यांना बळ
भिवरी गावात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरु असून शेतकऱ्याने लेखी तक्रार केल्यावर पंचनामा होवून एक वर्षे झाली आहेत. तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार यांनी कारवाई करणे अपेक्षित असताना हेक अधिकारी शासकीय गाड्यांमधून उत्खनन ठिकाणाला भेटी देत आहेत. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर वाहने जप्त करून उत्खनन थांबविणे आणि संबंधित व्यक्तींवर कारवाई होणे अपेक्षित असताना त्यांच्या भेटीनंतर उत्खननाला अधिकच बळ मिळत असून प्रचंड वेगाने उत्खनन होत आहे. त्यामुळे कुंपणच शेत खात असेल तर दाद कोणाकडे मागायची ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
भिवरी येथील उत्खनन बाबत माझ्याकडे तक्रार आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. येथील प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून कोणालाही खडी, मुरूम उपसा करता येणार नाही. तसेच त्यांना कोणी परवानगी दिली याची माहिती घेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
– विक्रम राजपूत, तहसीलदार, पुरंदर.