अमित ठाकरेंना भाजपचा पाठिंबा; पण विरोधात उमेदवार देण्यामागे नक्की रणनीती काय?
विधानसभा निवडणुकीसाठी माहीम मतदारसंघातून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र राज ठाकरेंनी अमित ठाकेरेंविरोधात उमेदवारी देऊ नये अशी मागणी महायुतीकडे केली होती. तरीही विद्यमान आमदार सदा सरवणकर या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारीसाठी पू्र्ण तयारीत असून उमेदवारीवर ठाम आहेत. त्यामुळे मतदारसंघात बंडखोरीची दाट शक्यता असताना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यामागे मोठी रणनीती असल्याचं म्हटलं आहे.
🕜 1.30pm | 30-10-2024📍Mumbai.
LIVE | Media interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/SUwYQYIGrL
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 30, 2024
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद शाधला, त्यावेळी पत्रकारांनी माहीम मतदारसंघातील राजकीय परिस्थितीबाबत आणि अमित ठाकरेंविरोधात असलेल्या उमेदवाराविषयी सवाल केले. त्यावरे फडणवीस म्हणाले की, माहीमध्ये महायुतीकडून उमेदवार देऊ नये अशी एकनाथ शिंदे यांचीही इच्छा होती. पण त्यात काही अडचणी आल्या. शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच असं म्हणणं होतं की इथंली मतं ठाकरेंच्या शिवसेनेला जातील. त्यामुळे त्या मतदारसंघात उमदेवार दिला आहे.
राज ठाकरेंनी या एकाच जागेवर महायुतीचा पाठिंबा मागितला आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे ही आमची पहिल्यापासूनची भूमिका राहिली आहे. भाजपचं कालही हेच मत होतं आणि आजही हेच मत आहे. सदा सरवणकर यांच्यासोबत आम्ही बसून बोलू तेव्हा ठरवू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
यावेळच्या निवडणुकीत सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरीचं प्रमाण मोठं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त बंडखोर परत कसे आणता येतील, यासाठी प्रयत्न सुरू आहे. पण काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, असंही त्यांनी नमूद केलं. त्यामुळे काही मतदारसंघांमध्ये महायुतीच्याच मित्रपक्षांचे उमेदवार आमने सामने असण्याची शक्यता आहे.
अमित ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा होती. तेव्हापासूनच अमित ठाकरे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असतील हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र अधिकृतरित्या ते वरळीतून निवडणूक लढतील अशी कोणतीही माहिती पक्षाकडून देण्यात आली नव्हती. मात्र मनसेने उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत अमित ठाकरे यांचं नाव जाहीर केलं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही माहिमधून अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले होते. आता ठाकरे गटाकडूनही उमदेवार देण्यात आला आहे.
महायुतीतून सदा सरवणकर आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत, तर सोमवारपर्यंत अर्ज माघार घेतला नाही तर महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे अशी तिरंगी लढत या मतदारसंघात पहायला मिळणार आहे.