सोलापूर दक्षिणच्या जागेसाठी सुभाष देशमुख आणि ठाकरे गटाच्या नेत्यामध्ये आर्थिक वाटाघाटी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी गाजत असताना महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या निवडीवरून उफाळलेल्या संघर्षाने मोठे वाद निर्माण केले आहेत. मंगळवारी फॉर्म भरण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक मतदारसंघांत AB फॉर्म वाटपावरून राजकीय खेळींना वेग आला. परांडा, लोहा, पंढरपूर, मिरज आणि विशेषत: दक्षिण सोलापूर या ठिकाणी ही समस्या अधिक तीव्र होती. यामध्ये काही मतदारसंघात शिवसेना नेत्यांची भाजपच्या उमेदवारांसोबत आर्थिक वाटाघाटी झाल्या असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने हे सुभाष देशमुख यांच्यासमोर मोठे आव्हान ठरणार होते. माने यांनी मागील लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंना 9000 मतांचा आघाडी मिळवून दिली होती, त्यामुळे माने यांची लोकप्रियता वाढली होती. त्यामुळे काँग्रेसच्या या पारंपरिक मतदारसंघात माने यांना उमेदवारी देण्याचे निश्चित मानले जात होते. मात्र, भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांना याचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे देशमुख यांनी ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्यासोबत आर्थिक वाटाघाटी करुन काँग्रेसचा हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडेच राहील यासाठी कारस्थान रचले, असल्याचे आरोप होत आहेत.
हे सुद्धा वाचा: “माझ्या पक्षाला कोर्टातून निशाणी मिळाली नाही…,” सत्तासंघर्षावरुन राज ठाकरेंचा टोला
भाजप नेत्याने केलेल्या या वाटाघाटीमध्ये ठाकरे गटाच्या नेत्याने दक्षिण सोलापूरसाठी नवखा उमेदवार अमर पाटील यांना उमेदवारी देण्याची खेळी केली. अमर पाटील यांची लोकप्रियता कमी असल्यामुळे ते सुभाष देशमुख यांच्यासमोर टिकू शकणार नाहीत, हे भाजपला माहित होते. त्यामुळेचं काँग्रेसच्या वाट्याची जागा नाकारून ठाकरे गटाकडून या जागेवर दावा सांगण्यात आला आहे. इतकेच नाही तर जागा वाटप पूर्ण होण्यापूर्वीच या ठिकाणी अमर पाटील यांना उमेदवारी देखील जाहीर करून टाकली होती. एकंदरीत या ठिकाणी काँग्रेसला जागा नाकारून भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी यशस्वी राजकीय खेळी केली असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
दिलीप माने यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि स्थानिकांच्या प्रश्नांवर काम करत प्रचंड विश्वासार्हता निर्माण केली होती. त्यांनी पाणी प्रश्न, वीज जोडण्या, आणि पीक विमा यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने काम केले. त्यामुळे मतदारसंघातील त्यांचा प्रभाव मोठा होता. माने यांना मिळणारे जनतेचे समर्थन वाढले होते. त्यामुळे माने यांना उमेदवारी मिळाल्यास देशमुख यांना विजयाची खात्री वाटत नव्हती. त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यत भाजपने ठाकरे गटाच्या नेत्याच्या माध्यमातून दक्षिण मतदार संघातून काँग्रेसला माघार घेण्यास भाग पाडले आणि माने यांना देखील उमेदवारीपासून वंचित ठेवले. परिणामी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होऊनही माने यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत AB फॉर्म देण्यात आला नाही. हे सगळे षडयंत्र हे ठाकरे गटाचा नेता आणि भाजप उमेदवारामध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराचा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
हे सुद्धा वाचा: 288 जागांवर 7995 उमेदवार रिंगणात, महायुती-मविआमध्ये किती जागांवर कोण लढणार?
दक्षिण सोलापूरसारखा काँग्रेसचा बालेकिल्ला उद्धव गटाच्या हातात दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. ठाकरे गटाकडून अमर पाटील यांच्या उमेदवारीसाठी वापरलेल्या दबाव तंत्रामुळे काँग्रेसची मोठी नामुष्की झाली आहे. त्यातच ठाकरे गटाकडून अमर पाटील सारख्या नवख्या उमेदवारासाठी केलेला अट्टहास पाहता, आर्थिक देवाणघेवाण झाल्याच्या संशय अधिकच बळावतो. थोडक्यात भाजपने महाविकास आघाडीकडून कमजोर उमेदवार यावा यासाठी आपल्या सोयीची परिस्थिती निर्माण केली आहे.
ठाकरे गटाचा नेत्यासोबत झालेल्या आर्थिक देवाण-घेवाणीनंतर आता दक्षिण सोलापूरमध्ये सुभाष देशमुख यांच्या विजयाचा शक्यता अधिक आहे. महाविकास आघाडीतील फूट आणि गद्दारी यामुळे भाजपला या निवडणुकीत सहजपणे विजय मिळवता येईल, असे जाणकारांचे मत आहे.