फोटो - सोशल मीडिया
सांगली : सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे. तसेच निवडणूकीच्या आधी आरक्षण दिले नाही तर निवडणूका लढू असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर ओबीसी समाजाचा यासाठी विरोध आहे. यावर आता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच बांगलादेशमध्ये हिंदू लोकांवर सुरु असलेल्या अत्याचारांवर देखील संभाजी भिडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच सांगली कडकडीत बंद ठेवणार असल्याचे देखील सांगितले आहे.
काय म्हणाले संभाजी भिडे?
शेजारील बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे. याच्या निषेधार्थ संभाजी भिडे पुढे असून यासाठी त्यांनी सांगलीमध्ये बंद पुकारला आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे येत्या २५ ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी भिडे यांनी दिली आहे. याबद्दल माहिती देताना संभाजी भिडे म्हणाले, बांगलादेशमधील हिंसाचाराविरोधात सांगलीत कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले आहे.
मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय?
माध्यमांशी संवाद साधताना संभाजी भिडे यांना मराठा आरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर भिडे म्हणाले, मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण जर ट्रेनिंग कॅम्पमध्ये निःशुल्क प्रवेश दिला तर वाघ आणि सिंहानी तिथे प्रवेश घ्यावा का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लबमध्ये मासळी प्रवेश घेईल का? अशाच पद्धतीने मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली आहे.