भिसी : वैनगंगा नदीपात्रातील ‘रेती’ची कांपा-शंकरपूर-भिसी या मार्गाने नागपूर, उमरेड, गिरड, सिर्सी या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या तस्करांची संख्या वाढली आहे. अवैध रेतीने भरलेल्या ट्रकची वाहतूक करत असताना पुयारदंडजवळ काही तरुणांनी हटकले. त्यावेळी चालकाने त्यांच्या अंगावर वाहन चालवण्याचा प्रयत्न करून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालकास ताब्यात घेतले.
गुड फ्रायडेनिमित्त शासकीय सुटी होती. ही संधी साधून रेतीने भरलेले वीस ते बावीस ट्रक पुयारदंड, गडपिपरी, आंबोली व भिसी या परिसरात आडमार्गाने वाहतूक करत होते. याचवेळी पुयारदंड गावाजवळ गोठणगाव फाट्याजवळ सकाळी 10 वाजताच्या सुमारास एम. एच.40 वाय. 9891 क्रमांकाचा ट्रक उभा होता. यावेळी गावातील तरुणांनी चौकशी केली असता चालकाने ट्रक चालू करून तरुणांच्या अंगावर ट्रक चालवण्याचा प्रयत्न करत पळ काढला. आरडाओरड केली असता गावातील महिला, पुरुषांनी रस्त्याकडे धाव घेतली.
या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आली. यावेळी कडक कारवाईचे आदेश भिसी पोलिसांना दिले. ठाणेदारांनी सहकारी घटनास्थळी पाठवून ट्रक व चालकाला ताब्यात घेतले. अवैध रेतीने भरलेले ट्रॅक भरधाव वेगाने गावातून वाहतूक होऊ नये, दिवसाढवळ्या रेती तस्करी करणाऱ्यांवर करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार व गावकऱ्यांनी केली आहे.