कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन जिल्हाप्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण या तालुक्यांकरता जिल्हाप्रमुख म्हणून संदेश पारकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे कणकवली विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या कार्यरत असणारे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्याकडे सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कुडाळ या तालुक्यांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच अतुल रावराणे हे कणकवली विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकारांद्वारे या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेले काही महिने सुरू असलेला शिवसेनेच्या पक्षांतर्गत पद नियुक्तींचा घोळ तुर्तास तरी सुटला आहे.
संदेश पारकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात पक्षाने संघटनात्मक जबाबदारी द्यावी. पक्ष देईल ती जबाबदारी आपण घेऊ आणि त्या पदाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करु तसेच पक्ष संघटना वाढीसाठी काम करु असे सांगितले होते. त्यानुसार पक्षाने संदेश पारकर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करुन पक्ष संघटना वाढीसाठी जबाबदारी पारकर यांना दिली आहे. त्यामुळे पारकर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम जोमाने सुरु ठेवण्यासाठी ऍक्टिव्ह होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.