भाजपचा रथ रोखण्यासाठी सांगलीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; आजी - माजी खासदारांसोबत आखली खास रणनीती
Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance: मोठी बातमी! महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस
महापालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती म्हणून सामोरे जाण्याची घोषणा केली होती. पण राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत भाजपची चर्चा जागा वाटपाच्या टप्प्यावर थांबली. त्यात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात मिरजेतील माजी महापौरसह अनेक नगरसेवकांनी प्रवेश केल्याने मिरजेतील भाजपची गणितेच बिघडली. त्यात राष्ट्रवादीने ३० जागांची मागणी करीत भाजपवर दबाव वाढविला होता. अखेर भाजप व राष्ट्रवादीने (अजित पवार) स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येण्याचा निर्धार केला. महाआघाडी म्हणून इच्छुकांच्या मुलाखतीही पार पडल्या.
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर सांगलीतील समीकरणेही बदलली आहेत. महाआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटासोबत आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षही सोबत येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील हे आज सांगलीत दाखल झाले. त्यानंतर या हालचालींना वेग आला. मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेत निवडणुक तयारीचा आढावा घेतला. महायुती नको, स्वतंत्रच लढू या, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला. रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, संजय बजाज यांची मंत्री पाटील यांच्यासोबत आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत नवीन ट्विस्ट झाला असून नव्या आघाडीमुळे भाजपसमोर आव्हान उभे राहणार आहे.
पक्षातील प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होते. ही आघाडीच्या चर्चेला काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम मात्र गैरहजर होते. ते सांगलीत नसल्याने बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीला खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह परंपरागत विरोधक असलेले राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित दादा राष्ट्रवादी गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील हेही बैठकीला उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादी (अजित पवार) व महाआघाडीत जागा वाटपावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसेची राज्यात युती झाली आहे. सांगलीतही हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. महाआघाडीसोबत शिवसेनेची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या मिळणाऱ्या जागेतून मनसेला जागा सोडल्या जाणार आहेत. जागा वाटपाची ही चर्चा फिस्कटल्यास सेना व मनसे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जातील, असे मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांनी सांगितले.






