Congress Politics: काँग्रेसमध्ये नेमकं चाललयं काय? दिग्विजय सिंह यांच्या पोस्टला शशी थरूरांचे समर्थन
Congress Politics: काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत त्यांनी एक पोस्टदेखील केली आहे. त्यात त्यानी आरएसएसच्या संघटनात्मक कौशल्याचे कौतुक केलं आहे. तसेच, आरएसएस प्रमाणे काँग्रेसनेही तळागाळात काँग्रेसचे संघटन वाढवावे, असा सललाही त्यांना दिला आहे. दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, प्रियांका गांधी यांनादेखील टॅग केल आहे. त्यांच्या पोस्टमुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ माजली.
दिग्विजय सिंह यांच्या या पोस्टवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनीदेखील सिंह यांच्या या पोस्टला समर्थन दिले आहे. तसेच काँग्रेसच्या संघटनावरही भाष्य केलं आहे.
दिग्विजय सिंह यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) म्हणाले की, दिग्विजय सिंह यांचे संपूर्ण विधान समजून घेतले पाहिजे. आमची संघटना मजबूत असावी आणि आमच्या संघटनेतही शिस्त असावी अशी माझीही इच्छा आहे.दिग्विजय सिंह संघटना मजबूत करण्याबद्दल जे बोलले ते अगदी बरोबर आहे. पण दिग्विजय यांनी त्यांच्या विधानाचे उत्तर स्वतःच दिले पाहिजे.
दिग्विजय सिंह यांनी लिहिले की, ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाला सुधारणांची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षातही संरचनात्मक बदल आवश्यक आहेत. तुम्ही “संघटना निर्मिती” निश्चितच सुरू केली आहे, परंतु पक्ष अधिक व्यावहारिक आणि विकेंद्रित पद्धतीने चालवला पाहिजे. राहुल गांधी हे करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या या पोस्टबद्दल विचारले असता, दिग्विजय सिंह यांनी थेट “मी संघटनेचा समर्थक आहे. मी संघाचा आणि मोदीजींचा कट्टर विरोधक आहे. मी फक्त संघटनेचे कौतुक केले आहे.” असे उत्तर दिले.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये, दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस पक्षातील संघटनात्मक सुधारणांच्या गरजेकडेही लक्ष वेधले. राहुल गांधींना टॅग करत त्यांनी म्हटले की, सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांबद्दल राहुल गांधींची (Rahul Gandhi) समज पूर्णपणे अचूक आहे आणि त्यासाठी त्यांना पूर्ण गुण मिळण्यास पात्र आहे. पण आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संघटनेकडे समान लक्ष देण्याची वेळ आली आहे.
दरम्यान, वाद वाढल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी स्पष्टीकरण देत आपण आरएसएस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. “मी केवळ संघटनेविषयी भाष्य केले होते. मी आरएसएस आणि मोदींचा कट्टर विरोधक आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.या विधानामुळे काँग्रेस पक्षात तसेच बाहेरही पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. विशेषतः पक्ष संघटना बळकट करण्याबाबत चर्चा सुरू असताना हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. या मुद्द्यावर काँग्रेस नेतृत्व पुढे कोणती भूमिका घेते आणि दिग्विजय सिंह यांच्या विधानाचा पक्षाच्या भविष्यातील राजकीय रणनीतींवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






