Ambegaon Election News: आंबेगावात राष्ट्रवादीची अग्निपरीक्षा; शिवसेनेला डावलल्यास बसू शकतो मोठा फटका
आंबेगाव तालुक्याची राजकीय राजधानी असलेल्या मंचर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष पदाचा निकाल नुकताच लागला. झालेल्या निवडणुकीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री गांजाळे या विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोनिक सुनिल बाणखेलेना २१० मतांनी पराभुत केले. २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपा अशी महायुती राहिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना मंचर शहरातून 2 हजार 200 हून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. मात्र त्याच मंचर शहरात आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला. त्याला कारणही तसेच आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला बरोबरीने घेतले नाही. भाजपा बरोबर युती केली.
तसे पाहिले तर मंचर शहरात आणि तालुक्यात भाजपचा पाहिजे तेवढा राजकिय प्रभाव नाही. भाजपची पाळेमुळे तालुक्यात आता कुठे वाढत चालली आहेत. त्या तुलनेत शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाचे राजकीय प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने शिवसेनेला विश्वासात घेणे गरजेचे आहे आणि तसे झाले नाही तर त्याची राजकीय किंमत आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निश्चितच मोजावी लागणार आहे.
आंबेगाव तालुक्याच्या राज को य परिस्थितीबाबत विश्लेषण करायचे झाले तर सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बैंकफुटवर येत चालला आहे. कारण पक्षात निष्ठावंतांना पक्षाच्या राजकारणात संधी दिली जात नसल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेत होत आहे. हुजरेगिरी करणाऱ्यांना झुकते माप आणि चटया उचलणाऱ्यांना मात्र बाजूला केले जात असल्याचे आता उघड उघड बोलले जात आहे. त्यामुळेच एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा आंबेगाव तालुक्यात सध्या पक्षाचा राजकीय बुरुज ढासळत चालला असल्याचे एकंदरीत राजकीय परिस्थितीवरून दिसून येत आहे.
BJP Brahmin MLA meeting : जातीवर आधारित राजकीय समीकरणे! भाजपच्या 40 ब्राम्हण आमदारांची चार
विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात अंतर्गत राजकीय धुसफुस चालू आहे. लोकमतातील कार्यकर्त्याला संधी न देता केवळ नेत्यांच्या जवळ कायम राहणाऱ्या कार्यकर्त्यालाच राजकारणात संधी आणि उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप नुकत्याच झालेल्या मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर आता सर्वसामान्य कार्यकर्ते उघड उघड बोलून दाखवत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालेले माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील हे दोघेही दिग्गज नेते तालुक्याच्या राजकारणात एकत्र असले तरी त्यांना राजकिय शह देण्यात इतर पक्ष यशस्वी ठरल्याचे दिसून येते.
आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकून ठेवायचे असेल तर पक्षश्रेष्ठींनी लोकमतातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संधी देणे गरजेचे आहे सर्वसामान्य कार्यकत्यांना विश्वासात घेऊन राजकीय रणनीती आखणे देखील तितकेच गरजेचे वाटते. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाला विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या तर तालुक्यात महायुतीला यश मिळणे दुर नाही. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे राजकीय भवितव्य अंधारात राहू शकते असा राजकीय तज्ञांचा अंदाज आहे.






