7 लाखांची लाच घेताना महापालिका उपायुक्त ACB च्या जाळ्यात; १० लाखांची केली होती मागणी
सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. सांगली (Sangli) महापालिकेचे उपायुक्त ७ लाखांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. उपायुक्त वैभव साबळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी १० लाखांची खंडणी मागितली होती, असा आरोप करण्यात आला आहे.
ठाण्यात पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांचे हाल, संजय केळकरांनी अधिकाऱ्यांना दिली ‘ही’ महत्वाची सूचना
महापालिका क्षेत्रातील एका 24 मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी साबळे यांनी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र 7 लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली. संबंधित व्यक्तीने एसीबीला याची माहिती दिली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि साबळेंना 7 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आणि साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान एसीबीच्या कारवाईत थेट महापालिका उपायुक्तच सापडल्यामुळे सांगलीत खळबळ माजली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकाऱ्याला 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतलं होतं.
शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल 41 लाखांची मागणी केली होती. त्यापैकी 23 लाख रुपये पोहोचले होते. मात्र, आणखी 18 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे संबंधित व्यक्तीने एसीबीकडे धाव घेतली. त्यानंतर, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून उपजिल्हाधिकाऱ्याला अटक केली. त्याच्या घराची झाडाझडती घेतली असतातब्बल 50 लाख रुपयांचं सोनं सापडलं होतं.