संजय निरुपम यांची टीका
मुंबई : एकामागून एक निवडणुकांमध्ये पराभव होत असल्याने काँग्रेस मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झालीय अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केली. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर काँग्रेस नेत्यांनी संशय व्यक्त केला, त्यावर निरुपम यांनी सडकून टीका केली.
निरुपम पुढे म्हणाले की, भारतीय मतदारांचा विश्वास संपादन करण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे निवडणूक निकालांवर संशय व्यक्त करणे, ईव्हीएमध्ये गडबड झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते करत आहेत. काँग्रेसच्या विरोधात मतदान होत असून तिथं भाजप, शिवसेनेचे उमेदवार विजयी होत आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, दिल्लीमध्ये अलिकडे झालेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी काँग्रेस आणि विरोधी आघाडीला नाकारले. सातत्याने पराभव होत असल्याने काँग्रेस नेते आता निवडणूक प्रक्रियेवर खापर फोडत आहेत.
गडबड निवडणूक प्रक्रियेत नसून तुमच्या मानसिकतेमध्ये आहेत. यातून काँग्रेस नेत्यांची मानसिक दिवाळखोरी दिसून आली, अशी टीका निरुपम यांनी केली. निवडणुकांमध्ये कोणतीही गडबड झालेली नाही हे सत्य काँग्रेस नेत्यांनी आणि राहुल गांधीनी आता स्वीकारायला हवे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा पराभवाचे विश्लेषण करायला हवे, असा टोला निरुपम यांनी लगावला.
“शिवसेना ठाकरे गटासाठी ही निंदनीय बाब असून उद्धव ठाकरे आता कार्यकर्ते राहिले नाहीत. त्यांचे विचार देखील संपले आहेत. त्यामुळे ते एका कॉमेडियनचा सहारा घेऊन राजकारण करत आहेत. मी या प्रकरणाच्या सुरवातीलाच सांगितलं होतं की कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत अशा प्रकारे आपत्तीजनक विधान केलं. पण कुणाल कामरा जे बोलला ते तो बोलत नसून ठाकरे गटाचे लोक बोलत आहेत”, असा आरोप संजय निरुपम यांनी केला.