"पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला मोठी किंमत मोजावी लागेल", संजय निरुपम यांचा इशारा (फोटो सौजन्य-X)
मुंबई : तुर्कीमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हा भारताकडून तुर्किला प्रचंड मदत पाठवण्यात आली होती. ऑपरेशन दोस्तच्या माध्यमातून भारताने तुर्कीला मदत केली होती. मात्र आज पाकिस्तानच्या बाजूला उभे राहून तुर्कीने कट्टर मुस्लिम देश असल्याचे दाखवून दिले. पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीविरोधात भारतीयांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून भविष्यात याची मोठी किंमत तुर्किला मोजावी लागेल, असा इशारा निरुपम यांनी दिला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निरुपम पुढे म्हणाले की, तुर्कीने फक्त पाकिस्तानला पाठिंबा नाही दिला तर तुर्किने पाकिस्तानला ड्रोन देखील दिले. त्या ड्रोन्सच्या मदतीने पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. मात्र आपल्याकडील सुदर्शन चक्राने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले परतवून लावले. तुर्कीच्या पाकधार्जिण्या भूमिकेमुळे भारतात तुर्कीविरोधात प्रचंड रोष आणि संताप असल्याचे निरुपम म्हणाले. तुर्कीबरोबरच अझरबैजान या देशानेही पाकिस्तानला पाठिंबा दिला. दरवर्षी ३ लाख भारतीय पर्यटक तुर्कीला भेट देतात. तर २ लाख पर्यटक अझरबैजानला जातात. मात्र आता जवळपास ५० टक्के पर्यटकांनी बुकिंग रद्द केले आहे. भारतीयांनी तुर्की आणि अझरबैजानला फिरायला न जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे या दोन्ही देशांना आर्थिक फटका बसेल, असे निरुपम म्हणाले.
तुर्की कंपन्यांविरोधात केंद्र सरकारने कारवाई सुरु केली आहे. सेलेबी या एअरपोर्ट ग्राउंड हॅंडलिंग सेवा देणाऱ्या कंपनीवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. त्याचबरोबर तुर्कीमधून येणारी फळे, सुकामेवा आणि इतर आयात वस्तूंवर भारतीय व्यापारांनी बहिष्कार टाकला आहे, असे निरुपम म्हणाले.
निरुपम पुढे म्हणाले की, सुमारे एक हजार वर्षापूर्वी भारतात मुस्लिम साम्राज्याची सुरुवात करणारे तुर्की लोक होते. भारतावर आक्रमण करणारा पहिला तुर्की शासक हा मोहम्मद गझनी होता. मोहम्मद घौरी हा तुर्की साम्राज्याचा संस्थापक होता. त्याने भारतातील बड्या मंदिरांवर हल्ले केले. पवित्र सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. ९०० वर्षापूर्वी जेव्हा तुर्कीमध्ये ब्रिटिशांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. देशातील मुस्लिमांनी १९१९ मध्ये जे खिलाफत चळवळ चालवली होती ती तुर्किमधील मुस्लिमांसाठी होती, असे निरुपम म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या पराक्रमाबद्दल शिवसेनेकडून राज्यात १८ मे २०२५ ते २४ मे २०२५ या दरम्यान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मे रोजी मुंबईत, १९ मे रोजी कोकण, २० मे रोजी पश्चिम महाराष्ट्र, २१ मे रोजी उत्तर महाराष्ट्र, २२ मे रोजी मराठवाडा, २३ मे रोजी पूर्व विदर्भ आणि २४ मे रोजी पश्चिम विदर्भात शिवसेनेकडून तिरंगा रॅली काढण्यात येईल, अशी माहिती निरुपम यांनी दिली.