"मुस्लिम मतांसाठी उबाठाने हिंदुत्वाशी गद्दारी केली", संजय निरुपम यांची घणाघाती टीका
मुंबई : मुस्लिम मतांसाठी बाळासाहेबांच्या विचार आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या उबाठाची हिंदू समाजातील विश्वसार्हता संपली, अशा शब्दांत शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज घणाघाती टीका केली. उबाठाच्या दुटप्पी भूमिकेवर हिंदूंमध्ये संतापाची लाट असून वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्या उबाठाला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे निरुपम यांनी खडसावले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तसेच उबाठाच्या नेत्यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे कोणत्याही जाती धर्माशी संबंध नसून स्थावर मालमत्तेशी संबधित आहे. वक्फ बोर्डाच्या ताब्यात जवळपास २ लाख कोटींची जमीन आहे, असेही उबाठा नेत्यांनी म्हटले आहे. त्यावर निरुपम म्हणाले की, उबाठावाल्यांना प्रॉपर्टीमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वक्फच्या जमीनींवर देखील उबाठाचे लक्ष होते का असा सवाल निरुपम यांनी केला.
मुस्लिम संघटनांनी निवडणुकीत उबाठाला फंडिंग केले होते. त्यामुळेच आता ते वक्फ बोर्ड विधेयकाबाबत सातत्याने हे विधेयक धर्माशी संबधित नसून मालमत्तेशी संबधित आहेत, अशी वक्तव्ये वारंवार करत आहेत.वक्फ विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे उबाठा नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. यावरुन उबाठा गट मुस्लिम मतांसाठी अशी सारवासारव करत आहे, अशी टीका निरुपम यांनी केली. ते पुढे म्हणाले की, वक्फ बोर्डाकडील जमीन ही भारताची भूमी आहे. या जमिनीचा जर कोणी दुरुपयोग करत असेल, त्यात जर घोटाळा झाला असेल तर सरकारला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे निरुपम म्हणाले.
खुलताबादचे पूर्वीचे नाव रत्नपूर होते, याबाबत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर उबाठा नेते देखील श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये २२ महिने मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी खुलताबादचे नामांतर का नाही केले, असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला. मतांसाठी मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचा प्रकार उबाठाने केला. त्याची मोठी किंमत त्यांना येत्या निवडणुकीत मोजावी लागेल, असे निरुपम म्हणाले.