मनसे नेते राज ठाकरे यांची हिंदी भाषा सक्ती रद्द केल्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होत असून महाराष्ट्रामध्ये आग्रहाने मराठी भाषा बोलली गेली पाहिजे अशी भूमिका मनसे पक्षाकडून घेतली जात आहे. सोशल मीडियावर परप्रांतीयांची मराठी भाषा न बोलण्याची मूजोरी पाहिल्यानंतर मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी कार्यालय आणि बॅंकामध्ये मराठी भाषा बोलली जात नसल्याचे म्हटल्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले. अनेकांनी बॅंकांमध्ये जाऊन मराठीचा आग्रह धरला. यानंतर आता राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर मनसे नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रामध्ये राहून मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या हिंदी भाषिकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसे स्टाईल दणका देखील दिला. यामुळे राज ठाकरे यांना अखेर कार्यकर्त्यांना ही प्रकार थांबवण्याचे आदेश द्यावे लागले. मात्र हिंदी भाषिकांना त्रास दिल्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली जात आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात नोंदणीकृत राजकीय पक्ष उत्तर भारतीय विकास सेनाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी राज ठाकरेंविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मराठी भाषा न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांविरुद्ध कथित द्वेषपूर्ण भाषण, लक्ष्यित हिंसाचार आणि धमक्यांसंबंधी अनेक प्रकरणे होत असून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावर आता मनसे नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सुनील शुक्ला यांच्या याचिकेवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करुन संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले आहे की, कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी .मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत ,महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी घेतली आहे.
कुठला तरी भैय्या म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी .मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर भैय्यांना मुंबईत ,महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल .
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 8, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याचिका दाखल केल्यानंतर सुनील शुक्ला यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदू्ंना मारायचा आदेश दिला आहे, असं वाटतं. तुम्ही केवळ उत्तर भारतीयांचे नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधत आहात. म्हणून मी तुमच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊन याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचे उल्लंघन करू शकत नाही. हिंदूंना तुम्ही मारू शकत नाही. आम्ही तुमचा विरोध करतो, निंदा करतो आणि सुप्रीम कोर्टातून तुमच्या विरुद्द आदेश आणणारच,” असा आक्रमक पवित्रा सुनील शुक्ला यांनी घेतला आहे. यानंतर आता राज ठाकरे काय प्रत्युत्तर देणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.