2029 च्या निवडणुकीबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? (फोटो- युट्यूब)
Cm Devendra Fadnavis: सध्या राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आहे. केंद्रात भाजप एनडीए आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यानंतर एक चर्चा सातत्याने होताना दिसून येत आहे. 2029 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान हा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल असे म्हटले जात आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतले जात आहे. दरम्यान आता यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमधील ‘इंडिया ग्लोबल फोरम’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी 2029 मध्ये पंतप्रधान कोण असणार यावर उत्तर दिले आहे. या कार्यक्रमात फडणवीस यांनी 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी 2029 मधील भावी पंतप्रधान कोण असणार आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार यावर भाष्य केले आहे.
बिकेसीमधील ‘इंडिया ग्लोबल फोरम’ कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी 2029 मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 2029 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याने त्यांच्या उत्तराधिकार्याबद्दल विचार करण्याची ही योग्य वेळ नाही.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजीनामा देण्यासाठी नागपूर दौऱ्यावर आले असल्याचा घणाघात केला होता. खासदार राऊत म्हणाले की, “संकेत स्पष्ट आहे, माहिती बाहेर येते सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे धोरण 75 वर्षीय झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. कोणत्याही मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती त्यांच्यामुळे सरसंघ चालकांनी त्यांना या त्यांच्या संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी ही चर्चा केली. दहा-अकरा वर्षांनी जाऊन नागपुरात सरसंघचालक यांना भेटावं लागलं ही काय साधी गोष्ट नाही इतक्या वर्षात कधीच गेले नाही – ईश्वराचा देखील मृत्यू झाला. राम गेले, कृष्ण देखील एका बाणाने पारध्याच्या लोक सोडून गेले. प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागते. देव असो या मनुष्य असो. नरेंद्र मोदी यांचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल,” असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी महाराष्ट्रामधून असून त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांकडे इशारा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचे मुळात काहीच कारण नाही. मोदी हे आमचे नेते आहेत. अजून पुढचे अनेक काळ ते काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की, 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडेच बघतो आहे. आमच्यासोबत पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.