मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारला 6 महिने झाले आहेत. या 6 महिन्यांत फक्त एकदाच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची सगळेजण वाट बघत आहेत. मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत शिंदे गटाचे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी माहिती दिली आहे. शिरसाट म्हणाले की, 20 ते 22 जानेवारीदरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. या तांत्रिक अडचणी 15 तारखेपर्यंत दूर होणार आहेत. त्यानंतर 20-22 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज शिरसाट यांनी व्यक्त केला आहे. सरकारमधील अनेक राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्रीपदे भरायची आहेत. काही गोष्टींमुळे विस्तार रखडलाय. विस्तार करावाच लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
[read_also content=”शिंदे सरकार व्हेटिंलेटरवर, 2024 साल राज्य सरकार पाहणार नाही, ठाकरे गटाच्या संजय राऊतांचा पुनरुच्चार https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-said-that-shinde-government-may-fall-soon-its-running-on-ventilator-nrsr-359873.html”]
शिवसेनेच्या भोंग्यामुळे पक्ष रिकामा होणार
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटावरही टीका केली. ते म्हणाले की, “पुढच्या काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे रिकामी होईल. शिवसेनेचे उर्वरित आमदार पुढील 8-10 दिवसांत शिंदे गटात सामील होणार आहेत. शिवसेनेत सकाळी सुरू असलेल्या भोंग्यामुळे ही वेळ येईल. भविष्यात निवडणूक लढवायची किंवा नाही असा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरेंपुढे उभा राहील.”
उद्धव ठाकरेंना मिसगाईड केलं जातंय
शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मिसगाईड करणारे लोक त्यांच्या आसपास आहेत. त्यामुळे शिवसेना संपत आहे. आजही तेच सुरू आहे. कोण बोलत आहे ? काय बोलत आहे? त्यांना पक्षाशी काहीच देणेघेणे नाही. या लोकांनी कधी थेट जनतेत जाऊन काम केले नाही. शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे. पण उद्धव ठाकरे शांत का आहेत हे कळत नाही.
शिरसाटांनी यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही टीका केली. अंबादास दानवे हे संजय राऊतांचे शिष्य आहेत. त्यामुळे ते त्या पद्धतीनेच बोलतात. राऊत आणि त्यांचे बोलण एकमेकांना साजेसे असते, असे ते म्हणाले.