वाल्मीक कराड शरणागतीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया (फोटो- ट्विटर)
Devendra Fadnavis: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप असलेले आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आले आहेत. वाल्मिक कराड यांनी स्वत: यासंदर्भातला एक व्हिडीओ जारी केला आणि त्यानंतर ते पुण्यात सीआयडीच्या स्वाधीन झाले. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपण निर्दोष असल्याचाही दावा केला आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप होताना पाहायला मिळत आहे. वाल्मीक कराडला आता कोर्टात हजर केले जाणार की नाही हे पहावे लागेल. दरम्यान यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 22 दिवसानंतर वाल्मीक कराड सीआयडीसमोर शरण आले आहेत. कराडने केलेल्या शरणागतीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘बीडच्या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही. हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. ज्याचा ज्याचा संबंध या प्रकरणात आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. गुंडांचे आम्ही राज्य चालू देणार नाही. कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही.’
गुंडांचे राज्य चालू देणार नाही, स्व. संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीला स्वायत्तता दिलेली आहे. याप्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही. ज्याच्याविरोधात पुरावा असेल, त्या प्रत्येकावर अतिशय कडक कारवाई होणार.
(माध्यमांशी संवाद | मुंबई | 31-12-2024)#Maharashtra #Mumbai #BeedCase pic.twitter.com/qyCIuhiSsK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 31, 2024
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “कोणालाही खंडणी मागता येणार नाही. आम्ही अत्यंत वेगाने तपास केला आहे. त्यामुळेच वाल्मीक कराड शरण आला आहे. हत्ये करणारे जे फरार आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी अनेक पथके सर्वत्र रवाना करण्यात आली आहेत. कुठलाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. सर्वांना शोधून काढू. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून त्यांना फाशी होत नाही तोवर ही कारवाई थांबणार नाही, असे आश्वासन मी धनंजय देशमुख यांना दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण जाणीवपूर्वक सीआयडीकडे देण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दवाब खवपून घेणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, असे फडणवीस म्हणाले.
वाल्मिक कराड याचं आत्मसमर्पण
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याने आज सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. सीआयडीने आतापर्यंतच्या केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कराड याची 100 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे.
हेही वाचा: Santosh Deshmukh: “वाल्मीक कराडवर गुन्हा दाखल होणार नाही कारण याचा बाप…”; आव्हाडांची घणाघाती टीका
वाल्मिक कराड महाराष्ट्रात असल्याचे तपासातून समोर आले होते. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे विशेष पथकही रवाना करण्यात आले होते. आजपासून सीआयडीच्या आणखी चार टीमही कराडच्या शोधासाठी पाठवण्यात येणार होत्या. तत्पूर्वी त्याने स्वत:हून आत्मसमर्पण केले आहे.दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा संशयित वाल्मिक कराड हा फरार होता. विशेष म्हणजे तो मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा माणूस असल्याचा आरोपही देशमुख यांच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात आहे. एकीकडे सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना दुसरीकडे बीड पोलीसदेखील या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्याने आत्मसमर्पण केले आहे.