खोटं बोलणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी हरवलं: विकास गोसावी
सातारा : हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपची सत्ता आल्याबद्दल आणि जम्मू-काश्मीरमध्ये मागच्या वेळी पेक्षा जास्त उमेदवार निवडून आल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील राजवाड्याजवळील गोल बागेसमोर आनंदोत्सव साजरा केला आणि नागरिकांना पेढे वाटून त्यांचे तोंड गोड केले.
भाजप सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सांगितले की, भाजप संविधान बदलणार असा नेरेटिव्ह सेट करून लोकसभेला जिंकण्याचा काँग्रेस-इंडिया आघाडीने प्रयत्न केला, परंतु हरियाणा आणि जम्मू कश्मीर या ठिकाणी झालेला विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची ही चाल दलित बांधवांच्या लक्षात आली. त्यांनी दोन्ही विधानसभेत भाजपला भरघोस मते दिली आणि काँग्रेस आणि इंडिया आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली.
दरम्यान, दोन्ही राज्यात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासात्मक मुद्द्याला मतदान झाले, त्याचप्रमाणे 370 कलम काढल्यानंतर मोठा हिंसाचार होईल, गदारोळ होईल, देश अस्थिर होईल अशा वल्गना करणारी काँग्रेस आणि इंडि आघाडी सपशेल तोंडावर आपटली.
जम्मू काश्मीरात वाढल्या विधानसभेच्या जागा
जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचा एक थेंबही न सांडता निवडणुका झाल्या, जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीला जरी सत्ता मिळाली असली तरीही मतांची टक्केवारी आणि विधानसभेच्या जागा वाढलेल्या आहेत. जनमताचा हा कौल पाहता महाराष्ट्रातील विधानसभेत सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सरकार येईल, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे
यावेळी ‘भारत माता की जय , वंदे मातरम्, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, हरियाणा तो झाकी है महाराष्ट्र अभी बाकी है’ या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. सातारकर नागरिकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.