परिवर्तनाच्या घोषणांनी दुमदुमला सातारा
सातारा : सामाजिक परिवर्तन, लोकसंस्कृती आणि विद्रोही विचारांचा जागर करत पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाची सुरुवात साताऱ्यात जल्लोषात झाली. शिवतीर्थ येथून निघालेल्या स्वागत मिरवणुकीने शहरातील प्रमुख मार्गांवर लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सहभागी झालेले युवक, पारंपरिक मावळे, वासुदेव आणि बाल वारकरी यांच्या उपस्थितीमुळे मिरवणुकीला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.
“जय शिवराय” आणि “जय भीम”च्या घोषणांनी परिसर भारावून गेला होता. शाहीर संभाजी भगत यांच्या उपस्थितीने मिरवणुकीत विशेष उत्साह निर्माण झाला. यावेळी प्रा. डॉ. सोनाझारिया मिन्झ, डॉ. भारत पाटणकर, ह.भ.प. सुहास फडतरे महाराज, विजय मांडके, संजय गाडे, गणेश भिसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते. मिरवणूक शिवतीर्थातून सुरू होऊन पवई नाका, सेवन स्टार परिसर, राधिका रोड आणि राधिका चौक मार्गे ग्रंथनगरी येथे दाखल झाली. मार्गभर लोककलेचे विविध सादरीकरण, ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक कलाप्रकारांचे दर्शन घडत होते. त्यामुळे नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीला प्रतिसाद दिला.
तब्बल ४ लाख हेक्टर क्षेत्रावर होणार पेरणी ! कृषी विभागाकडून नियोजन; शेतकऱ्यांचे सोयाबीनकडे कल
ग्रंथनगरी येथे पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते क्रांती ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना लक्ष्मण माने यांनी विद्रोही साहित्य चळवळ ही समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना आवाज देणारी चळवळ असल्याचे सांगितले. साताऱ्यातील हे संमेलन परिवर्तनवादी चळवळींसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






