Satara News: सातारा शहरावर पाणीसंकट! सांबरवाडीत भूस्खलनामुळे 'कास' योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्या तरी नगरपालिका कर्मचारी दिवस-रात्र काम करत आहेत. गळती दुरुस्त करून कास पाणीपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी गटनेते अविनाश कदम, आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नगरसेवक रवींद्र ढोणे, राजू गोरे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्यांनी दुरुस्तीचे काम दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
नगराध्यक्ष अमोल मोहिते म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसातही नगरपालिका कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत काम करणे आव्हानात्मक असले तरी नागरिकांना लवकरात लवकर नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.” काम पूर्ण होताच कास योजनेतून शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कास योजनेला तांत्रिक अडचणींचे ग्रहण
सांबरवाडी परिसरातील भूस्खलनामुळे मुख्य जलवाहिनीला गळती निर्माण.
मुसळधार पावसामुळे उत्खनन आणि दुरुस्तीचे काम वारंवार विस्कळीत.
चिखल व घसरडी परिस्थितीमुळे यंत्रसामग्रीच्या वापरात अडथळे.
मुख्य जलवाहिनी असल्याने दुरुस्तीपूर्वी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची गरज.
गळतीची अचूक जागा शोधणे आणि पाइपलाइन सुरक्षितपणे उघडणे ही मोठी तांत्रिक प्रक्रिया.
दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर दाब चाचणी (प्रेशर टेस्ट) करूनच पाणीपुरवठा सुरू केला जाणार.
नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी नगरपालिका आणि संबंधित विभागाकडून पर्यायी उपाययोजनांवर भर






