अखेर २२ वर्षांनंतर अंपायर Steve Bucknor यांनी मागितली माफी (Photo Credit -X)
ही घटना २००३-०४ मधील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील ब्रिस्बेन कसोटीदरम्यान घडली होती. त्यावेळी सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीचा एक चेंडू सचिनच्या पॅडला लागला आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले. अनुभवी पंच बकनर यांनी क्षणाचाही विलंब न लावता बोट वर केले आणि सचिनला ‘एलबीडब्ल्यू’ (LBW) बाद घोषित केले.
22 Years Later, Steve Bucknor Breaks Silence On Controversial Tendulkar LBW https://t.co/pcKtTyDVmh pic.twitter.com/G5p3XKoTcR — CricketNDTV (@CricketNDTV) February 24, 2026
रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होते की, चेंडू स्टंप्सच्या खूप वरून जात होता. सचिन केवळ ३ धावांवर असताना त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. प्रसिद्ध समालोचक टोनी ग्रेग यांनी त्यावेळी लाइव्ह कमेंट्रीमध्ये या निर्णयाचे वर्णन “भयानक चूक” असे केले होते. या एका चुकीच्या निर्णयामुळे सामन्याच्या निकालावरही मोठा परिणाम झाला होता.
आता ७९ वर्षांचे असलेल्या स्टीव्ह बकनर यांनी वेस्ट इंडिज क्रिकेट अंपायर्स असोसिएशनला दिलेल्या मुलाखतीत ही चूक मान्य केली. “सचिन तेंडुलकरला एलबीडब्ल्यू देण्याचा निर्णय ही माझी मोठी चूक होती. आजही लोक मला त्या निर्णयाबद्दल विचारतात. मानवी जीवनात चुका घडतात आणि मी ही चूक प्रांजळपणे स्वीकारतो,” असे बकनर यांनी नमूद केले. तंत्रज्ञान (DRS) येण्यापूर्वी पंचांच्या एका निर्णयाचे वजन किती असायचे, याची जाणीव या विधानाने करून दिली आहे.
स्टीव्ह बकनर यांनी सचिनला चुकीचे बाद देण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. या घटनेच्या दोन वर्षांनंतर, भारत-पाकिस्तान सामन्यात अब्दुल रज्जाकचा चेंडू सचिनच्या बॅटला स्पर्श न करता गेला असतानाही बकनर यांनी त्याला बाद दिले होते.
सचिन तेंडुलकरनेही काही काळापूर्वी एका सत्रात या आठवणींना उजाळा दिला होता. बकनर यांच्या निर्णयाबद्दल विचारले असता सचिन मिश्किलपणे म्हणाला होता की, “मी फलंदाजी करत असताना कदाचित त्यांना (बकनर) बॉक्सिंग ग्लव्हज घालायला द्यायला हवे होते, जेणेकरून ते बोट वर करू शकणार नाहीत.”
२२ वर्षांनंतर आलेल्या या कबुलीमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक प्रकारचे समाधान मिळाले असले, तरी त्या निर्णयामुळे भारताने गमावलेली संधी क्रिकेट इतिहासात कायमची नोंदली गेली आहे.






