औरंगाबाद – मुख्यमंत्र्यांनी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात आज सभा घेत ठाकरे गटांवर कडाडून टीका केली. त्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही हल्लाबोल केला. संदिपान भुमरे डाकू माणूस आहे, त्यांच्या सभेला कोण येणार? बाहेरून लोक आणली गेली, अशी टीका खैरे यांनी केली आहे.
रावसाहेब दानवे संदिपान भुमरेंना बोक्या म्हणाले. यापुढेही आम्हीही भुमरेंना बोक्या म्हणणार. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणात दम नव्हता. आजची सभेची स्पाॅन्सरशिप भाजपची होती, असा टोलाही खैरेंनी यावेळी लगावला.
चंद्रकांत खैरे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या भाषणात दम नव्हता. ते टेन्शन आणि प्रेशरमध्ये बोलताना दिसले. या सभेसाठी पैठण तालुक्यातील मोजकेच लोक होते. ही सभा पैठण तालुक्याची नव्हती तर, नगर, परभणी, जालना, येथील लोकच जास्त होती.
चंद्रकांत खैरे म्हणाले, संदिपान भुमरे हा डाकू माणूस आहे. त्यामुळे डाकूच्या सभेला पैठणचे लोक येणार नाही, याची त्यांनाही कल्पना होती म्हणूनच सभेला गर्दी जमवण्यासाठी महिलांना तीनशे रुपये आणि पुरुषांना पाचशे रुपये दिले जात होते. या सभेसाठी औरंगाबाद शहरातील नारेगाव, चिकलठाणा, घनसावंगी, पाथर्डी, नेवासा , शेवगाव, सिल्लोड येथून लोक पैठणला नेण्यात आले.