मनसेने अमित ठाकरे यांना दादर-माहिम मतदारसंघातून उमदेवारी दिली आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गट अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचे संकते संजय राऊत यांनी दिले आहेत.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांकडून उमदेवारांची घोषणा सुरू आहे. मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ४५ उमदवारांची दुसरी यादी जाहीर केली. अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गट अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का, असा प्रश्न होता. मात्र शिवसेनेनेही माहिममधून आपला उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर शिंदे गटाने काही तासात उमेदवार जाहीर केला त्यामुळे माहिममध्ये हायहोल्टेज लढत पहायला मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात अमित ठाकरे निवडणूक लढणार असल्याची जोरदार चर्चा होती. तेव्हापासूनच अमित ठाकरे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात असतील हे निश्चित झालं होतं. मात्र अधिकृतरित्या ते वरळीतून निवडणूक लढतील अशी कोणतीही माहिती पक्षाकडून देण्यात आली नव्हती. मात्र काल मनसेने आपली दुसरी यादी जाहीर केली. ४५ उमदेवारांच्या या यादीत अमित ठाकरे यांचंही नावं होतं. त्यांना माहिमधून उमदेवारी देण्यात आली आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही माहिमधून अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमदेवारांची यादी जाहीर केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याही शिवसेनेने उमेदवारांची घोषणा केली. शिंदे गटाने माहिमधून अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटानेही या मतदारसंघात आपला उमेदवार दिला तर तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवारी देणार नसल्याची माहिती होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळीतून पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले, त्यावेळी मनेसेने त्यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता संजय राऊत यांनी माहिममधून उमेदवारी देणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दादर माहिम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली आहे. त्यामुळे तिथे शिवसेना लढणार नाही, असं कधीही होणार नाही. माहिममध्ये शिवसेनेने आजपर्यंत निवडणूक लढवली आहे. मात्र आमच्याच परिवारातले अमित ठाकेर या मतदारसंघातून निवडणूक लढवत असतील तर त्यांचं स्वागत आहे. वरळीतूनही मनसेने उमदेवार दिला आहे. त्यांचाही एक राजकीय पक्ष आहे. समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडीही उमेदवार देते. भाजपला मदत करण्यासाठी या सर्व शक्ती तयार झाल्या आहेत, काही पक्षांचे उमेदवार वर्षानुवर्षे निवडून येत नाही तरी निवडणूक लढतात. लोककशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेना दादर माहिममधून निवडणूक लढवणार नाही असं होणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले आहेत.