मराठ्यांचा इतिहास अजरामर होणार! आग्रा, संगमेश्वर अन् पानिपतसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद, नक्की काय आहे प्लान?
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात आग्रा भेटीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. तिथे भव्य शिवस्मारक उभारण्याची घोषणा करण्यात येणार आहे. शिवाय संगमेश्वरला संभाजी महाराजांना कैद झाली, इथे संभाजी महाराजांनी असीम शौर्य व धैर्याने लढा दिला होता, तिथे संभाजी महाराजांचं स्मारक आणि पानिपतावरही मराठ्याच्या इतिहासाच्या पाऊलखुना संपूर्ण जगाला माहिती व्हाव्यात यासाठी स्मारक उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा करण्यात आली आहे.
अजित पवार म्हणाले, “छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन इथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची मी घोषणा मी करतो.”
लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपतमध्ये स्मारक उभारणार
“स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पानिपत येथे यथायोग्य स्मारक उभारण्याचा निर्णयही आम्ही घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल.”
Maharashtra Budget 2025 : हक्काच्या घरासाठी फडणवीस सरकार किती मदत करणार? अजित पवारांनी केली घोषणा
आग्र्यात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार
मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.