राजापूर तालुक्यासह लांजा, रत्नागिरी येथील शिवप्रमींनी तालुक्यातील नाटे येथील घेरा यशवंतगड येथे साफ सफाई मोहीम राबवण्यात आली. किल्ल्यातील वाढलेली झाडे-झुडपे तोडत बरुजावरती झालेले अतिक्रमण मोकळं करण्यात आलं. बुरुजाभोवतीची वाढलेली झाडी दूर झाल्यामुळे गडाच्या बुरूजांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे किल्ल्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या गडकोट प्रेमींना किल्ला व्यवस्थित पहाता येणार आहे.
राजापूर तालुक्यातील नाटे येथील यशवंत गड किल्ल्याचा परिसर विस्तीर्ण असून अनेक वर्षे किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात झाडे वाढली आहेत. त्यामुळे किल्ला पुर्णपणे झाड, वेलींनी झाकून गेला आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्वपूर्ण अंग असलेले व मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे, या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने या गडकोट स्वच्छता मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.
तिथीनुसार शिवजयंती उत्सवासाठीचे निमीत्त साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्थानिक शिव संघर्ष संघटना नाटे आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान राजापूरच्या वतीने या मोहीमेचे आयोजन केले होते. या मोहीमेत जैतापूरचा राजा मंडळ, शिवतेज प्रतिष्ठान कोतापूर, श्रीमंत योगी प्रतिष्ठान भू पंचक्रोशी यांच्यासह रत्नागिरी येथील राजा शिवछत्रपती परिवार, लांजा येथील शिवगंध प्रतिष्ठानचे शिलेदारही सहभागी झाले होते.
राजापूरातील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी रविवारी सकाळी जवाहर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन या मोहीमेला सुरूवात केली. नाटे येथील यशवंत गडावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी शिवसंघर्ष संघटना नाटेसह अन्य संघटनेचे कार्यकर्ते या मोहीमेत सहभागी झाले. तटबंदीच्या आतील भाग साफ करण्यात आला. तटबंदीवर झाडे वाढल्याने तटबंदी ढासळू नये याकरीता अशी झाडे तोडण्यात आली. तसेच किल्ल्याबाहेर असलेल्या खंदकामध्ये वाढलेली झाडे तोडून तटबंदी मोकळी केली. या मोहीमेत लहान मुले, महिला, तरूण आणि वयोवृध्द अशा सर्व वयोगटातील सुमारे 80 शिलेदार सहभागी झाले होते.
यापूर्वीही अनेक दुर्गप्रेमी संघटनांनी याठिकाणी साफ-सफाई केलेली आहे. परंतु अजूनही किल्ल्यातील आतील बराचसा भाग हा जंगली झाडा-झुडपांनी वेढलेला असल्याने आणखीन काही साफ-सफाईच्या मोठ्या मोहीमा या सातत्याने घ्याव्या लागतील. एकंदरीत राजापूरातील या ऐतिहासिक सागरी किल्ल्याचे संवर्धन आणि जतन होणे हे फार महत्वाचे असल्याचे मत शिवसंघर्ष संघटना व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे मनोज आडविलकर आणि महेश मयेकर यांनी व्यक्त केलं. घेरा यशवंतगडाची डागडुजी करण्यासाठी स्थानिक व इतर गडकोटप्रेमींचा व्यापक सहभाग वाढवून पर्यटनदृष्ट्या राजापूरचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपण कार्यरत रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.