भास्कर जाधव यांनी आपल्या नाराजीवर भाष्य केले (फोटो - सोशल मीडिया)
रत्नागिरी : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असून महायुतीचा एकतर्फी विजय झाला आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. अनेक नेत्यांनी साथ सोडून सत्ताधारी पक्षामध्ये हातमिळवणी केली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून राजन साळवी यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. तर यानंतर भास्कर जाधव यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली.
कोकणामध्ये ठाकरे गटाची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे. कोकणातील एकच आमदार असलेले भास्कर जाधव हे देखील महायुतीमध्ये नाराज आहेत. ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्यामुळे ठाकरे गटाला गळती लागल्याची दिसत आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही असं विधान भास्कर जाधव यांनी केलं होतं, यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले भास्कर जाधव?
भास्कर जाधव यांच्या विधानामुळे शिवसेना ठाकरे गटामध्ये ते नाराज असल्याचे चित्र होते. शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत असल्याचे देखील वक्तव्य केले होते. याबाबत भास्कर जाधव म्हणाले की, माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या ४३ वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे. कोणी दिली नाही, कोणत्या पक्षाने, नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही. त्या पुढं जाऊन मी असं म्हणालो की, हे केवळ माझ्याच वाट्याला आलं असं नाही, असं अनेकांच्या बाबतीत घडतं, म्हणून हे माझं दुर्दैवं आहे, हा दोष मी माझ्याकडे घेतला,” असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ही राजकीय स्टंटबाजी केली जात असल्याची टीका देखील भास्कर जाधव यांच्यावर करण्यात आली. याबाबत भास्कर जाधव म्हणाले की, “गेल्या 43 वर्षांच्या राजकीय जीवनात कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरिता, पद मिळवण्याकरिता मी कधी नौटंकी केली नाही. मी कधी नाटकबाजी केली नाही, रडगाणं गात बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळालं तर माझ्या नशिबानं. नाही मिळालं तर…. म्हणून हे मी विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याकरिता म्हणून हे सगळं करतोय, पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय.. मी कोणाकडे तरी जाणार याासाठी वातावरण तयार करतोय… माझ्या आयुष्यात असली नौटंकी कधी केली नाही. माझ्या आयुष्यातील किती राजकीय वर्ष राहिली? जे मी त्या काळात केलं नाही, आता कशाला करेल? हे मी पद मिळवण्याकरिता करतोय हा माझ्या मनाला लागलेला विषय आहे,” असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भास्कर जाधव पुढे म्हणाले की, जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन. काही जणांनी तर असंही दाखवलं की पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारची स्टंटबाजी केली आणि गणनेते पद पदरात पाडून घेतलं…. अरे ज्या माणसाने ४३ वर्षे अनेक पदे उपभोगली… पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा कुठल्यातरी पदाकरिता मी करणं आणि माझ्या तत्व प्रणालीला गालबोट लावणं मी कधीही केलं नाही. मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे. जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन,” असेही भास्कर जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, “माझ्यामध्ये काही राजकीय दोष आहेत. राजकारणात ते दोष असावेत की नाही यावर चर्चा होऊ शकते. मी खोटं बोलत नाही, मला समोरचा माणूस खोटं बोलला की प्रचंड चीड येते. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द मी प्राण गेला तरी खाली पडू देत नाही. कोणाला खूष करण्यासाठी मी बोलत नाही. खरं काय ते बोलण्याचं धाडस माझ्यात आहे,” असेही भास्कर जाधव म्हणाले.
“४३ वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली आहे. कारकिर्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळात आपल्या हातून चांगलं काहीतरी घडावं यासाठी माझी तळमळ आहे,” असेही भास्कर जाधव म्हणाले.