मोखाड्यात कृषीमंत्री कोकाटेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र निषेध
दीपक गायकवाड /मोखाडा:विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा ऑनलाइन जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने मोखाडा येथे प्रतिकात्मक प्रेतयात्रा आणि पुतळा दहन करत जोरदार निषेध नोंदवण्यात आला.
या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाप्रमुख दिलीप मोंहडकर यांनी केले. मोखाडा नगरपंचायतपासून बसस्थानकापर्यंत कोकाटे यांची प्रेतयात्रा काढण्यात आली. आंदोलनादरम्यान ‘सातबारा कोरा करा’, ‘राजीनामा द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. बसस्थानक परिसरात पोहोचताच कृषीमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा हवेत पत्ते उडवत दहन करण्यात आला.
या आंदोलनामागे फक्त एक व्हिडिओ नसून त्यामागे शेतकऱ्यांचे दुःख, त्यांना हमीभाव मिळत नसणे, खते वेळेवर न मिळणे, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान अशा वास्तविक समस्या आहेत, असे आंदोलक म्हणाले.
कृषीमंत्री अधिवेशनात या विषयांवर ठोस भूमिका घेण्याऐवजी ऑनलाइन जुगार खेळत होते, यामुळे नैतिकदृष्ट्या त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा आरोप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला.
या वेळी तालुका संघटक दिलीप बांडे, निलेश निंबारे, ज्येष्ठ शिवसैनिक पांडुरंग चौधरी, रविंद्र कटिलकर, माजी नगरसेवक ऋषिकेश लोखंडे, मनोज लचके, सौरभ आहेर, जयेश जाधव, सनी झिंजुर्डे, प्रकाश आरडे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“राज्यातील शेतकरी आज संकटात असताना कृषीमंत्री मात्र पत्याचा खेळ खेळतात, ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी तातडीने नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा,” अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.