आटपाडी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जंयती निमित्त आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील गोमेवाडी हायस्कूलच्या मैदानावर 30 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान (Wrestling in Atpadi) आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील प्रसिद्ध मल्ल सिकंदर शेखची (Sikandar Shaikh) पंजाब केसरी भोला पंजाब (Bhola Punjab) सोबत प्रथम क्रमांकाची लढत होणार आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास 3.5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
आटपाडी तालुक्यातील युवा उद्योजक अक्षय अर्जून व मित्रपरिवाराने कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. गोमेवाडी येथील गोमेवाडी हायस्कूलच्या मैदानावर जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी 15 लाख रुपये पर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. या कुस्ती स्पर्धेच्या आयोजनात युवा उद्योजक विनायक मासाळ, रमेश उर्फ बंडू पाटील, राजू अर्जून यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
प्रथम क्रमांकासाठी 3 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक
पहिल्या क्रमांकासाठी सिकंदर शेख विरुद्ध भोला पंजाब यांच्यात लढत होणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 3 लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर द्वितिय क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उप महाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांच्यात लढत होणार आहे. द्वितिय क्रमांकासाठी 2 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
‘या’ नामांकित मल्लांच्या कुस्त्यांचे आयोजन
तृतिय क्रमांकासाठी मल्ल महारुद्र काळे विरुद्ध सुबोध पाटील यांच्यात लढत होणार आहे. तृतीय क्रमांकासाठी 2 लाख रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. चौथ्या क्रमांकासाठी संदिप मोटे विरुद्ध गणेश कुंकले यांच्यात लढत होणार आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 1 लाख 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
पाचव्या क्रमांकासाठी तानाजी विरकर विरुद्ध किशोर पाटिल यांच्या लढत होणार आहे. ही कुस्ती 1 लाख रुपयांसाठी ठेवण्यात आली आहे. सहाव्या क्रमांकासाठी मयूर मोरे विरुद्द हनमंत काळे यांच्यात 51 हजार रुपये पारितोषिकाची कुस्ती होणार आहे. सातव्या क्रमांकासाठी शिवम दुधाळ विरुद्ध नाथा पवार, प्रतिक गौंड विरुद्ध विक्रम वेताळ आणि आशपाक तांबोळी विरुद्ध निनाद बडरे यांच्या प्रत्येकी 41 हजार रुपयांसाठी कुस्ती होणार आहे.