सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी २३ सागरी किनारपट्टीवर होणारी संक्रमण आणि किनारपट्टीची होणारी धूप यामुळे किनारपट्टी विद्रूप होत चालली असून देवबाग सह किनारपट्टीभागचा नष्ट होत चालला आहे. किनारपट्ट्यांच्या संरक्षणासाठी येत्या २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत आचरा ते देवबाग संगम सागरी यात्रा काढून किनारपट्टीवरील मच्छीमारांचे राहते घर, पर्यटन परिसराचा भाग आणि मच्छीमारी व्यवसाय विकासातून किनाऱ्या लगतची गावे आनंदी आणि समृद्ध करण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यासाठी पर्यटन मत्स्य व्यवसाय कृषी पर्यटन विषयक शासनाला देशी, विदेशी पर्यटक राहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने एक कृती आराखडा तयार करून या सागरी यात्रेच्या निमित्ताने तो शासनाला सादर केला जाईल .या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या यात्रेमुळे शासनाचे लक्ष वेधेल असा दावा ब्रिगेडियर सुधीर सावंत (Brigadier Sudhir Sawant)यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथे मच्छिमार समाज आणि पर्यटन व्यवसाय असणाऱ्या जनतेला किनारपट्टीवरील गावे समृद्ध आणि आनंदी बनविण्यासाठी सागरी यात्रा एक धडक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आचरा संगम ते देवबाग संगम या परिसरामध्ये ही सागरी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. २७ ते २९ ऑगस्ट, २०२३ रोजी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी कृषीविज्ञान केंद्राचे भास्कर काजरेकर, देवबाग सरपंच विलास तांडेल, प्रा विलास सावंत आदी उपस्थीत होते.
ब्रिगेडीयर सुधीर सावंत म्हणाले की, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा किनारपट्टा आहे. त्या ठिकाणी मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात. पण अलीकडच्या काळामध्ये किनारपट्टी धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी धूप होऊन किनारपट्टी विद्रूप होत आहे. वाळू वाहून जात आहे. त्यामुळे बीच नष्ट होत आहेत. या सर्व गोष्टींसाठी आचरा संगम ते देवबाग संगम या किनारपट्टीतील गावामध्ये दिनांक २७ ते २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सागरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये किनारपट्टीच्या नागरिकांशी चर्चा करून प्रत्येक गावाच्या समस्यांचा अभ्यास करून विकासात्मक धोरण ठरविण्यात येणार आहे.
किनारपट्टीचे संरक्षण करण्यामध्ये बरेच वर्ष दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता योग्य नियोजन करून बंधारे आणि धूप प्रतिबंधक बंधारे बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व गावांचा एक मास्टर प्लॅन तयार झाला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये पर्यटनासाठी आणि मच्छिमारांसाठी जेटी बांधण्याची गरज आहे. सर्व खाड्यांमध्ये प्रचंड गाळ साठलेला आहे. तो गाळ काढून प्रवासी आणि मच्छिमार बोटींना खाड्या खुल्या केल्या पाहिजेत. मच्छिमारांचा मासेमारी हा प्रमुख उद्योग आहे. मासेमारीसाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. प्रत्येक गावामध्ये मासेमारी आणि पर्यटक बंदर बनविण्यात यावी. मच्छिमारांसाठी पूर्वीसारखी मदत होण्यासाठी विशेष मच्छिमार पॅकेज निर्माण करण्यात यावे. मागे आम्ही एक पॅकेज निर्माण केले होते. तसे मुलभूत गोष्टी निर्माण करण्यासाठी हे पॅकेज असावे.
माधवराव शिंदे पर्यटन मंत्री असताना १९९२ मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर करण्यात आला होता. अनेक लोकांनी निवास योजना देखील सुरु केली. या घरांसाठी पर्यटक आणण्यासाठी गरज आहे. त्यासाठी एमटीडीसीने पर्यटक केंद्रांना स्टार दर्जा देणे गरजेचे आहे. जागोजागी पर्यटन केंद्र उभारणे, सार्वजनिक ठिकाणी माहितीचे फलक लावणे, स्वच्छता गृह उभारणे, जलक्रीडा सुविधा आणि साहसी खेळांच्या सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.
मच्छिमारांचे जीवन, उपजीविका आणि अन्न सुरक्षा शाश्वत होण्यासाठी त्यांच्या विकासाचे धोरण ठरवून त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. चक्रीवादळे, सीआरझेड सिमांकन, सागरी बंदर प्रकल्प, मासेमारीचा कालावधी अशा अनेक विषयांवर मच्छिमारांशी चर्चा करून विकासाचे धोरण ठरवण्यात येणार आहे. ही सागरी यात्रा पक्षविरहित असून मच्छिमार समाज आणि पर्यटन व्यवसाय असणाऱ्या जनतेला समृद्ध आणि आनंदी बनविण्यासाठी ही सागरी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये सर्व लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ब्रि .सुधीर सावंत यांनी केले आहे.






