भडगाव : शहरातील पाचोरा रोडवरील (Pachora Road) पॉवर ऑफिसजवळ बोलेरो पिकअप गाडीमध्ये सहा गुरांना कोंबून कत्तलीसाठी घेऊन जात असताना भडगाव विश्व हिंदू परिषदेच्या (Vishva Hindu Parishad) कार्यकर्त्यांनी पकडले. ही घटना 11 मार्चला दुपारी एकच्या सुमारास घडली. याबाबत भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बाळासाहेब चव्हाण हे भडगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भडगाव शहरातील पाचोरा रोडवर पॉवर ऑफिसजवळ पांढऱ्या रंगाची पिकअप गाडीत सहा गुरे दिसली. प्राण्यांची वाहतूक करण्याचा परवाना नसताना देखील अवैधरित्या निर्दयी कोंबून भरून कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जात असताना मिळाले. यामध्ये एक लाख 85 हजार रुपयांचे सहा गोरे व दोन लाख 50 हजार रुपयांची पिकअप गाडी असा एकूण चार लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आला आहे.
दरम्यान, सहा गुरांना गो शाळेत रवाना करण्यात आले आहे. याबाबत आरोपी रईस खान सईद खान (रा. कुर्बान नगर पाचोरा), शे. सईद शे. बुढण (रा. बाहेरपुरा पाचोरा) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन वाबळे हे करीत आहे.