फोटो - टीम नवराष्ट्र
शाहुवाडी : सोंडोली (ता. शाहुवाडी) येथील ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेतील शिक्षकाची बदली रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी शाळेला टाळे ठोकण्यात आले आहेत. अनेकदा प्रशासनाकडे या बाबतीत निवेदने देऊन त्याचा पाठपुरावा करुनदेखील सबंधित शिक्षकाची बदली रद्द करण्यात आलेली नाही. ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
सोंडोली येथे पहिली ते सातवीपर्यंत सात वर्ग असून या शाळेची पटसंख्या ८५ इतकी आहे. कोरोनामुळे त्या दोन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही खालावली होती. मात्र त्यानंतरच्या काळात शिक्षक म्हणून नेमणूक झालेल्या कानिफ अंकुश काकडे या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अमर्याद कष्ट घेतले. यातून विद्यार्थ्यांची चांगली प्रगती झाली. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधूनदेखील काकडे या शिक्षकाबद्दल आत्मीयता वाढली. मात्र ऐच्छिक बदली दरम्यान त्यांची बदली झाली. ग्रामस्थांनी त्यांना परत याच शाळेत थांबण्याची विनंती केली. काकडे यांनी देखील या विनंतीला मान देत आपली या शाळेत थांबण्याची तयारी असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तशा स्वरूपाचा पाठपुरावा सूरू केला.
जिल्हा व तालुका प्रशासनाला लेखी निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाकडून त्याची कोणतीच दखल घेतली गेली नाही. अखेर येथील ग्रामस्थांनी या मागणीसाठी शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. आता जोपर्यंत काकडे यांची बदली रद्द होत नाही. तोपर्यंत शाळेचे टाळे उघडणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी सरपंच भिमराव पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, शाळा समितीअध्यक्ष संजय नेर्लेकर, उपाध्यक्ष सुरेखा चोरगे, हणमंत जाधव, तटांमुक्त अध्यक्ष भिमराव पाटील, सुरज सांवत, शिवाजी चोपडे, शिवाजी पाटील, कमलेश पाटील, आण्णा पाटील, बाळु म्होळे, राणी पाटील, कमल चोपडे, आनदा पाटील, रुपाली म्होळे, जिजा पाटील, तानाजी पाटील, बाळू चोपडे, प्रकाश चोपडे, शितल कुभांर व पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






