फोटो सौजन्य - Social Media
चंद्रहास नगरकर, महाड: महाड एसटी डेपोच्या रामदास पठार ते महाड या बसला (एमएच 20 बीएल 3822) 15 मार्च 2025 रोजी अपघात झाला. वरंध घाटातील बेबीचा गोल येथे एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली. या भीषण अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. सर्व जखमींना तत्काळ महाडच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या सर्व प्रवाशांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी पुढे येत जखमींना बाहेर काढण्यास हातभार लावला. बस अपघाताची माहिती मिळताच महाड पोलिस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य हाती घेत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवले. बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून, काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.
अपघाताच्या प्राथमिक तपासानुसार, बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असावा, अशी माहिती बस चालकाने दिली आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताची चौकशी सुरू केली असून, तांत्रिक तपासणी अहवालानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. वरंध घाट हा अत्यंत धोकादायक वळणांमुळे प्रसिद्ध आहे. येथे अनेक वेळा अपघात झाले असून, वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अपघाताची माहिती मिळताच राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी महाड ट्रॉमा केअर सेंटरला भेट देऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांकडून जखमींच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना दिल्या.
या अपघातामुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वरंध घाटातील धोकादायक वळणांवर सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच, सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांची वेळोवेळी तपासणी करूनच प्रवासासाठी पाठवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.