पर्यटकांच्या सेवेसाठी एसटीची शिवनेरी धावली
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात राज्यातील विविध भागातील पर्यटक खोळंबले होते. त्यांना विशेष विमानाने सुखरूपपणे मुंबईत आणून मुंबईहून पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी पाठवण्याचे नियोजन एसटीने केले आहे. पर्यटकांना धीर देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक विमानतळावर उपस्थित होते.
गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पर्यटकांचे विशेष विमान मुंबई विमानतळावर (टर्मिनल 2) येथे दाखल झाले. पहिल्या विमानामध्ये 175 पर्यटक आणि दुसऱ्या विमानात 77 पर्यटक आहेत. मुंबईहून त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी 8 शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, अडकलेले 252 पर्यटकांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. पर्यटकांना धीर देत मुंबईहून पुढील प्रवासासाठी त्यांनी माहिती दिली.
प्रवासादरम्यान सर्व पर्यटकांची चहा-नाश्त्याची आणि जेवणाची सोय करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना दिल्या. एसटी महामंडळाने केलेल्या मदतीसाठी पर्यटकांनी धन्यवाद दिले.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ ब्रीदवाक्याचे पालन
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्याचे पालन एसटी महामंडळ सातत्याने करत आहे. कोणत्याही आपात्कालीन परिस्थितीमध्ये प्रवासी वाहतूक विना अडथळा पूर्ण करण्याचे काम एसटी चालक वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने सातत्याने करत आहेत. कोरोना काळात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणे, अतितीव्र पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबल्यानंतर शहरातून उपनगरात प्रवासी वाहतुकीची जबाबदारी महामंडळाने सुरक्षितपणे पूर्ण केली आहे.
हल्ला करुन निर्माण करण्यात आली अशांतता
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत.
माजी मुख्यमंत्र्यांचा परराष्ट्र सचिवांना फोन
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना महाराष्ट्रातील गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. यावरुन आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट परराष्ट्र सचिवांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.