एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! (Photo Credit- X)
राज्यभरात टप्याटप्याने नव्या बसेस खरेदी करून जुन्या व जीर्ण झालेल्या बसेस सेवेतून काढून टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातच ८०० स्व-मालकीच्या बसेसची निविदा व प्रशासकीय प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून लवकरच त्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, वाहनसंख्या वाढत असताना त्यानुसार चालक व वाहकांची कायमस्वरूपी भरती न झाल्याने संपूर्ण सेवा व्यवस्थेवर ताण वाढण्याची चिन्हे आहेत.
सध्या अनेक आगारांमध्ये चालक व वाहक पदांची मोठी रिक्तता असून, वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा, दीर्घकालीन सेवा हमी व प्रशासकीय संरक्षण नसल्याने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी बदल होत असून, त्यामुळे मार्गनियोजन व प्रवासी सेवा विस्कळीत होत आहे.
दरम्यान, शासनाकडून सेवा विस्तार व आधुनिकीकरणाचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मनुष्यबळ व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाल्यास नव्या बसेसचा अपेक्षित लाभ प्रवाशांपर्यंत पोहोचणार नाही, असा इशाराही तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे वाहन खरेदीबरोचरच तातडीने नियमित चालक व वाहक भरतीची प्रक्रिया सुरू करणे हाच एसटी सेवा सावरण्याचा खरा मार्ग असल्याचे स्पष्ट होत आहे.
कंत्राटी चालकांवर अवलंबून राहणे ही चूक वाहकांची कमतरता ही समस्या अधिक तीव्र स्वरूपाची बनली असून, काही ठिकाणी चालकांवरच तिकीट वितरणाची जबाबदारी येत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून प्रवाशांच्या दृष्टीनेही ही बाब चिंताजनक ठरत आहे. नियमित भरती न करता केवळ कंत्राटी व्यवस्थेवर भर देणे म्हणजे व्यवस्थेतील मूलभूत त्रुटींवर तात्पुरते मलमपट्टी करण्यासारखे असल्याची टीका होत आहे.
कर्मचारी संघटनांनी स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, एसटीसारख्या सार्वजनिक संस्थेत कंत्राटी चालकांवर अवलंबून राहणे ही धोरणात्मक चूक असून ती प्रशासकीय अपयशाचेच द्योतक आहे. नव्या बसेस खरेदीवर कोट्यवधीचा खर्च होत असताना, त्याच वेळी स्थायी व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत ठोस निर्णय न होणे ही गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.






