एसटी कर्मचारी काँग्रेस आक्रमक (फोटो- सोशल मीडिया)
कर्मचाऱ्यांना मिळाला नाही वेतनवाढ फरक हप्ता
अर्थ खात्यात १० फेब्रुवारी पासून फाईल निर्णयाविना पडून
एसटी कामगारांमध्ये असंतोष पसरला
मुंबई: एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांना वेतनासोबत या महिन्यात वेतनवाढ फरक हप्ता मिळाला नसून राज्य सरकारच्या अर्थ खात्यात १० फेब्रुवारी पासून फाईल निर्णयाविना पडून आहे. हप्ता न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरला असून “बोंब मारो “आंदोलन अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्याशिवाय कर्मचारी राहणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
या संदर्भातील आंदोलन नोटीस परिवहन खात्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मार्फत राज्य सरकारला देण्यात आली असून २४ फेब्रुवारी रोजी, आझाद मैदान, मुंबई येथे हे आगळे वेगळे आंदोलन करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाने निधी संदर्भात १६ वेळा पत्रव्यवहार केला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सुद्धा जातीने लक्ष देत आहेत.राज्य सरकारच्या परिवहन विभागाने सुद्धा अनेकवेळा पत्रव्यवहार करून सुद्धा अर्थ खात्यातील अधिकारी लक्ष द्यायला तयार असून ते झोपेचे सोंग घेऊन सुस्त झाले आहेत.
अर्थ खात्याचा प्रभार असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करावी, अन्यथा कर्मचाऱ्यांना बोंब मारो आंदोलन करून कानउघडणी करावी लागेल असेही बरगे यांनी म्हटले आहे…
एसटी महामंडळातील ८६००० कर्मचाऱ्यांना या महिन्यात वेतनवाढ फरक रक्कम हप्ता मिळाला नसल्याने त्यासाठी राज्य सरकारकडे १९२. ४६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
‘लालपरी’ची चाके थांबणार? सरकारला २ दिवसांचा अल्टिमेटम; ST ‘बंद’चा दिला इशारा
दर महिन्याला सरकार कडून येणाऱ्या सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कमेसह एकूण ७२५ .४६ कोटी रुपयांची मागणी केली असताना फक्त ४०० कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकार कडून देण्यात आल्याने एसटीचे आर्थिक गणित बिघडले असून या महिन्यात वेतनवाढ फरकाची वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली नाही. याला निव्वळ राज्य सरकारचे अर्थ खात्यातील अधिकारी जबाबदार असून उद्वरित रक्कम येत्या सोमवार पर्यंत न मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा आक्रोश व असंतोष कळावा यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.






